Charoti Highway Accident: चारोटी उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; भरधाव कार दुभाजकावर आदळली
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलाजवळ गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
संबंधित कार गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येत होती. चारोटी उड्डाणपुलाजवळील धोकादायक वळणावर कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणातच कार दुभाजकावर आदळली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले.
या अपघातात सुशांत साहू (32), अर्चना साहू (25), शिल्पा साहू ( 28) आणि अल्मा साहू (दीड वर्षे) हे चौघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रवासी आतमध्ये अडकले होते. स्थानिक नागरिक आणि महामार्गावरील इतर वाहनचालकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नागझरी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती दिली.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चारोटी परिसरात यापूर्वीही वेगवान वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

