

Ajit Pawar BMC Elections 2026: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असून, उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या यादीत 37 उमेदवारांची नावे आहेत. पक्ष सुमारे 100 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हा निर्णय पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या मंजुरीनंतर घेतल्याची माहिती सना मलिक यांनी दिली. “मुंबईत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत. साधारण 100 जागांवर आमची तयारी आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या घोषणेमुळे मुंबईच्या राजकारणातील हालचालींना वेग आला आहे.
पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्या कुटुंबाला स्थान देण्यात आलं आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा आरिफ खान आणि सून बुश्रा मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कप्तान मलिक आणि सईदा आरिफ खान हे माजी नगरसेवक असून, बुश्रा मलिक पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत.
बुश्रा मलिक यांना प्रभाग क्रमांक 170 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा प्रभाग महिलांसाठी आरक्षित असून, याआधी येथे कप्तान मलिक प्रतिनिधित्व करत होते. कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165 मधून, तर सईदा आरिफ खान प्रभाग क्रमांक 168 मधून निवडणूक लढवणार आहेत.
या यादीत आणखी एक लक्षवेधी नाव म्हणजे धनंजय पिसाळ. त्यांनी अलीकडेच शरद पवार गटाची राष्ट्रवादी सोडून अजित पवार गटात प्रवेश केला असून, त्यांना प्रभाग क्रमांक 111 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीआधीच झालेल्या या पक्षांतरामुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत.
एकूणच, अजित पवार गटाची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये असून, पुढील टप्प्यात आणखी उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची लढत यामुळे अधिक रंगतदार होणार, हे निश्चित.