

BJP campaign song
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागला आहे. विविध पक्षांनी मतदारांना साकडे घालण्यासाठी मोहीम आखली आहे. विकास कामे आणि आपले चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचेल याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी भाजपने तयार केलेले प्रचार गीत आयोगाने नाकारले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अत्यंत उत्साहात तयार केलेले विशेष प्रचार गीत वादाच्या भोऱ्यात सापडले आहे. या गीतामध्ये 'भगवा' या शब्दाचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत या गीताला परवानगी नाकारली आहे. भाजपचे हे प्रचार गीत अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीच्या प्रचारासाठी आता त्यांना नवीन रणनीती आखावी लागणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकूण २२७जागांपैकी तब्बल २९ जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे विरुद्ध भाजप, शिवसेना शिंदे गट महायुती अशा थेट लढती रंगल्या आहेत. काँग्रेस, वंचित आघाडीने उमेदवारच न दिल्याने या सर्व वॉर्डात दुरंगी लढती होत असून मतविभाजनाची शक्यता मावळली आहे. त्यामुळे याचा लाभ ठाकरे बंधूंना मिळणार की महायुतीला याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.