महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा

लवकर जागा वाटपाची भाजपाची रणनीती

Published on

[author title="दिलीप सपाटे" image="http://"][/author]

मुंबई :  लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या चर्चेचे गुर्‍हाळ शेवटपर्यंत चालल्याने महायुतीला काही जागांवर फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अनुभवाने सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी लवकर जागा वाटप करून कामाला लागण्याची रणनीती आखली आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेसाठी जादा जागा पदरात पाडून घेण्यासाठी आग्रही राहणार असल्याने जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणे अवघड दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपमध्ये आत्मचिंतन सुरू आहे. या निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभा निवडणुकीत टाळण्याच्या सूचना भाजपा पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्या आहेत. महाविकास आघाडीने दोन तीन जागांचा अपवाद वगळता जागावाटप लवकर करून प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, महायुतीच्या जागा वाटपाचे गुर्‍हाळ उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत लांबले. अनेक जागांवर अखेरपर्यंत सहमती झाली नाही. परिणामी उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. आता ही चूक दुरुस्त करून दोन महिने आधीच जागा वाटपावर सहमतीचे भाजपाचे प्रयत्न आहेत.

लोकसभा निवडणुकीत महायुतीत सर्वाधिक स्ट्राईक रेट गाठणारी एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधानसभेच्या जागांसाठी आक्रमक राहण्याचे संकेत आहेत. शिवसेनेचे सुमारे 40 आमदार असून काही अपक्ष आमदारही शिंदेंच्या सोबत आहेत. त्याच्या संख्येच्या दुप्पट जागा मिळविण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. शिवसेना वर्धापनदिनी वरळीत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात शिवसेना नेते रामदास कदम यांनी, तर 100 जागांची मागणी केली आहे.

अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही जादा जागांसाठी आग्रही आहे. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी किमान 80 ते 90 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 42 आमदार असून राष्ट्रवादीलाही त्यांच्या दुप्पट जागा हव्या आहेत. त्यामुळे दोन्ही प्रमुख घटक पक्षांनी 160 ते 180 जागांवर दावा सांगितल्याने भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे.

जिंकलेल्या जागा वगळून चर्चेची तयारी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या मित्रपक्षांसह 164 जागा लढविल्या होत्या. तर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 124 जागा मिळाल्या होत्या. भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या आहेत. या जागा भाजपा काही केल्या सोडणार नाही. भाजपने जिंकलेल्या 105 आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून असलेल्या 82 जागा अशा 187 जागा सोडून उर्वरित 101 जागांवर चर्चा करण्याची भाजपाची रणनीती आहे. या जागांवर ज्या पक्षाला अनुकूल वातावरण असेल आणि जिंकणारा उमेदवार असेल त्या पक्षाला जागा सुटावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news