‘नेट’ परीक्षा रद्दचा 10 हजार विद्यार्थ्यांना फटका

‘नेट’ परीक्षा रद्दचा 10 हजार विद्यार्थ्यांना फटका

[author title="प्रवीण मस्के" image="http://"][/author]

कोल्हापूर : देशभर 'नीट' परीक्षेत झालेला गोंधळ ताजा असतानाच आता यूजीसी-नेट परीक्षेत अनियमितता आल्याच्या कारणाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नेटचा पेपर रद्द केला. यामुळे जिल्ह्यातील सुमारे 10 हजार विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. परीक्षा घेणार्‍या संस्थेच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना हा फटका बसला असून पुन्हा फेरपरीक्षा देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नेट परीक्षेच्या गोंधळामुळे होणार्‍या विद्यार्थ्यांच्या नुकसानीवर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून…

दरवर्षी यूजीसीच्या वतीने नेटची परीक्षा घेतली जाते. वर्षातून जून व डिसेंबर महिन्यात दोनवेळा परीक्षा होते. यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. यावर्षी 18 जून रोजी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) झाली. पेपर क्र. 1 संशोधन पद्धती 100 गुण व पेपर क्र. 2 हा विषयनिहाय 200 गुण अशी मिळून 300 गुणांची परीक्षा असते. यापूर्वी नेटची परीक्षा ही ऑफलाईन होत होती. 2018 पासून ही परीक्षा सीबीएसईऐवजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ऑनलाईन पद्धतीने घेतली जात आहे.

यावर्षीच्या नेट परीक्षेस कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थी बसल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी दिली. मंगळवारी पेपर झाल्यावर 19 जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षेतील गोंधळ व अनियमितेमुळे पेपर रद्द केला. तसेच परीक्षेची सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले. नेटची परीक्षा रद्द झाल्याने नवीन परीक्षा केव्हा होणार? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे आगामी काळातील नोकरभरतीस विद्यार्थी मुकणार आहेत. दुसरीकडे राज्यासह देशभरातील नामांकित संस्थेत संशोधनासाठी प्रवेशास विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत.

राज्य सरकारकडून लवकरच प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नेट परीक्षा न दिलेल्या अनेक उमदेवारांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच पीएच.डी.साठी नेट परीक्षा आवश्यक असल्याने यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. सरकारी नोकर भरतीसाठी वयोमर्यादेची अट असते. नेट परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थी वयाची मर्यादा ओलांडून पुढे जाणार आहेत. त्यामुळेही नुकसान होणार आहे.

आर्थिक भुर्दंड, पुन्हा तयारी करावी लागणार

नेट परीक्षेत गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला. मात्र, परीक्षा रद्द झाल्याने देशभरातील 11 लाखांहून विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षेसाठी अर्जाचा आर्थिक भुर्दंड याबरोबरच नेट परीक्षेची नव्याने तयारी करावी लागणार आहे. यामुळे विद्यार्थी हतबल झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news