Yoga Day 2024 : योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता

Yoga Day 2024 : योग म्हणजे ईश्वराशी एकरूपता

[author title="सुभाष पाटील" image="http://"][/author]

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणे हा जागतिक आणि विशेषत: भारताच्या दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग बनला असला, तरी त्याचे खरे महत्त्व आपल्या अंतरात्म्यात आहे. 'योग' या शब्दाचा मूळ अर्थ आहे ईश्वराशी सायुज्यता, म्हणजेच सर्व ती खरी एकरूपता जी जीव आजन्म शोधत असतात. पृथ्वीवरील बहुतांश लोकांना योगाविषयी माहिती आहे; परंतु त्यांच्यापैकी बहुतेक लोक त्याला शारीरिक व्यायाम किंवा हठयोगातील योगासने म्हणूनच ओळखतात. तरीही समजून घेण्यासारखे आणि प्रत्यक्षात करण्यासारखे असे योगामध्ये अजूनही बरेच काही आहे! (Yoga Day 2024)

'योगीकथामृत' या प्रख्यात आध्यात्मिक अभिजात पुस्तकाचे लेखक श्री श्री परमहंस योगानंद हे एक अग्रगण्य भारतीय गुरू होते. सत्याचा शोध घेणार्‍या मुमुक्षू साधकांना योगाच्या खर्‍या अर्थाचे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी पाश्चिमात्य देशांत प्रवास केला. जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी ध्यान हा सर्व साधकांच्या 'कृती योजने' चा अविभाज्य भाग असला पाहिजे, यावर ते देत असलेला भर समयोचित आणि कालातीत होता. योगानंद यांनी म्हटले आहे की, जीवनाचे सर्वोच्च ध्येय म्हणजेच आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वराशी एकरूपता आणि त्याच्या पूर्ततेचा एकमेव मार्ग म्हणजे आध्यात्मिक प्रयत्न. त्यांचे स्वत:चे गुरू, स्वामी श्री युक्तेश्वरगिरी यांचे पुढील वचन सुविख्यात आहे- 'तुम्ही आता जर आध्यात्मिक प्रयत्न केले, तर भविष्यात सर्व काही सुधारेल!' अंतिम सत्याच्या प्राप्तीसाठी ईश्वराच्या प्रत्येक साधकाला आपली क्षमता वाढवणारे आणि क्रमाक्रमाने पुढे नेणारे एक वैज्ञानिक तंत्र आवश्यक असते आणि योगानंद यांनी 'योगीकथामृत'मध्ये त्याविषयीच लिहिले आहे.

क्रियायोग हा सर्वोच्च प्रकार आहे आणि ईश्वरासोबत भावैक्य प्राप्त करण्याचा मानवाला ज्ञात असलेला अग्रगण्य मार्ग म्हणून याच विशिष्ट वैज्ञानिक मार्गावर योगानंद यांनी भर दिला. क्रियायोगामध्ये विशिष्ट वैज्ञानिक तंत्राचा समावेश आहे. त्यामुळे साधकाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य निश्चितच सुधारते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याद्वारे योगी स्वतःमधील ईश्वरी उपस्थितीचे स्पष्ट संकेत म्हणजेच खरी शांती आणि आंतरिक आनंद मिळविण्यास अंतिमत: सक्षम होतो.

योगानंद यांनी, आपल्या पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दोन्ही अनुयायांना समजावून सांगितले की, क्रियायोगाचा सराव प्रत्येकजण करू शकतो आणि तो अस्तित्वाच्या सर्वोच्च स्तरावर जाण्याचा सुनिश्चित मार्ग आहे. त्यांनी काही प्राथमिक तंत्रे, तसेच कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगितले, जी क्रियायोग ध्यानाच्या सर्वोच्च प्रवेशद्वाराकडे नेणारी आवश्यक पावले आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानेही दोन वेळा क्रियायोगाचा गौरवशाली शब्दांत उल्लेख केलेला आहे. लाखो लोकांना क्रियायोग ही एक जीवनपद्धती म्हणून त्याच्या सर्व प्रकटीकरणासह अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली आहे. तथापि, क्रियायोगाचा खरा फायदा त्याचा प्रामाणिकपणे सराव करण्यात आहे, असे स्वामी श्री युक्तेश्वर गिरी यांचे गुरू श्री लाहिरी महाशय यांनी आग्रहपूर्वक सांगितले आहे. आपल्या वरच्या स्तरावरच्या अस्तित्वाचे सुवर्ण प्रवेशद्वार शोधावयाचे असेल, तर ते क्रियायोगाच्या अर्थपूर्ण आणि नियमित सरावामध्येच मिळेल.

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वायएसएस) ही 1917 मध्ये योगानंद यांनी स्थापन केलेली आध्यात्मिक संस्था आहे. 'वायएसएस' ही संस्था पुस्तके, मुद्रित पाठ आणि इतर माध्यमांद्वारे योगानंद यांच्या विपुल शिकवणीविषयी सखोल अंतर्द़ृष्टी प्रसारित करीत आहे. गेल्या काही दशकांत संपूर्ण भारतात आणि जगभरात क्रियायोगाचे अनुसरण करणार्‍या साधकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 'वायएसएस'च्या रांची येथे नुकत्याच झालेल्या 'साधना संगम'मध्ये एक तरुण साधक म्हणाला की, योगानंद यांची शिकवण आणि क्रियायोगाचा मार्ग यांनी माझे जीवन संपूर्ण बदलले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news