

Kalyan Dombivli Mahapalika Election BJP News :राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने निकालाआधीच आपले खाते उघडले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पक्षाला मोठं यश मिळालं आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपच्या रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या प्रभागातून रेखा चौधरी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने आणि कोणताही अतिरिक्त अर्ज न आल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या असून, सध्या त्या भाजपच्या कल्याण विभाग महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या विजयाकडे भाजपकडून ‘हिंदुत्वाचा पहिला विजय’ म्हणून पाहिले जात आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांना या यशामुळे मोठं बळ मिळालं असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. पक्षाने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देत, हा विजय संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं फळ असल्याचं म्हटलं आहे.
याचबरोबर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजपाच्या उमेदवार आसावरी केदार नवरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे दोन नगरसेवक आधीच विजयी झाले आहेत.
महापालिका निवडणुकीचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे असतानाच मिळालेल्या या बिनविरोध विजयामुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपने चांगली सुरुवात केली आहे. एकूणच, निकालाआधीच मिळालेल्या या दोन बिनविरोध विजयांनी भाजपचा महापालिका निवडणुकीत आत्मविश्वास वाढला आहे.