BJP Operation Persuasion : मुंबईत आता भाजपकडून 'ऑपरेशन मनधरणी'

बंडोबांशी चर्चा करण्याआधी भाजपचे वरिष्ठ नेते घेणार परिणामांचा वस्तुनिष्ठ आढावा
BJP
BJPPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अभूतपूर्व गोंधळाची स्थिती समोर आली असून, बंडखोरी झालेल्या जागांवरील स्थितीचा आढावा घेण्याचे काम स्थानिक पातळीवर 'कोअर ग्रुप'कडे सोपविण्यात आले आहे. बंडोबांची मनधरणी मोहीम हाती घेण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे.

संभाव्य बंडाळी रोखण्याच्या उद्देशाने उमेदवारांची यादीच जाहीर न करण्याचे धोरणही निष्प्रभ ठरले. उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक ठिकाणी बंडाळीसोबतच इच्छुकांच्या संतप्त प्रतिक्रियाही राज्यभरात उमटल्या. एकट्या मुंबईत भाजपमध्ये सुमारे ३० जागांवर बंडखोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी (दि.30) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली.

मुंबईत भाजपचे उपाध्यक्ष असलेल्या कमलाकर दळवी यांनीच उमेदवारी नाकारली गेल्याने अपक्ष अर्ज दाखल केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातच दोन दोन तिकिटे दिल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत आमदार, खासदारांची मुले किंवा विधानसभा निवडणूक लढविलेल्या उमेदवारांना पालिका निवडणुकांचे तिकीट न देण्याचे पक्षाचे धोरण होते. बहुतांश ठिकाणी हा नियम काटेकोरपणे पाळला गेला. त्यामुळे काही तगड्या उमेदवारांना आपल्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागली. मात्र, राहुल नार्वेकरांच्या मतदारसंघात या नियमाला अपवाद करण्यात आल्याची भावना आहे.

परिणामांची चाचपणी करणार

संभाव्य बंडखोरीचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, बंडखोरांमुळे भाजपची राजकीय गणिते बिघडणार का, याची चाचपणी करण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे. यासाठी स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत कोअर ग्रुपला आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरच नाराजांची समजूत घालण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक आमदार, खासदारांना त्यासाठी कामाला लावले जाणार आहे. त्यानंतर मुंबईतील प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. त्यात किती जणांचे अर्ज वैध ठरतात, यावरही बरेचसे गणित अवलंबून आहे. बुधवारी अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी दोन दिवसांची मुभा आहे. त्यामुळे अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी नक्की होण्यापूर्वी बंडखोरीचा नेमका किती फटका बसणार, याचा वस्तुनिष्ठ आढावा भाजपकडून घेतला जाणार आहे. त्यानुसार मनधरणीचे प्रयत्न केले जातील.

बोरिवली पूर्वेत भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी थेट ठाकरे गटात प्रवेश केला, तर वॉर्ड क्रमांक १५५ मध्ये ठाकरे गटातून आलेल्या श्रीकांत शेट्ये यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमधील तीन इच्छुकांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे, तर पक्षातील निर्णय प्रक्रियेवर बोट ठेवत मुलुंडमधील भाजप पदाधिकारी मनीष तिवारी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, तर धारावीत स्थानिकांनाच उमेदवारी देण्याची मागणी करत रमेश नाडर आणि त्यांच्या समर्थकांनी दादर येथील मुंबई भाजपच्या कार्यालयातच घोषणाबाजी केली. तर, वॉर्ड क्रमांक २०० मध्ये पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने, आमचे काय चुकले, असा प्रश्न करत गजेंद्र धुमाळ आणि संजय दास्ताने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

वॉर्ड क्रमांक १७७ मधील माजी भाजप नगरसेविका नेहल शाह यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे. भाजपने या वॉर्डात कल्पेशा जेसल कोठारी यांना उमेदवारी दिली आहे.

... तोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत न जाण्याचे धोरण

बंडखोरांच्या मनधरणीसाठी पहिल्याच फटक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय न्यायचा नाही. शक्यतो स्थानिक पातळीवर विषय मिटवायचा. परिस्थिती आटोक्यात न आल्यास शेवटचा पर्याय म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या दरबारी बंडखोरीचा विषय नेण्याची भाजप नेत्यांची योजना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news