

Ram Kadam
मुंबई : मुंबईच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी चर्चेचे कारण कोणतेही राजकीय विधान नसून त्यांचा एक जुना संकल्प आहे. घाटकोपर पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न सुटल्यानंतर राम कदम यांनी तब्बल ४ वर्षांनंतर आपले केस कापले आहेत. त्यांनी या घटनेला 'जनतेचा विजय' आणि 'संकल्पाची पूर्ती' असे म्हटले आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी घाटकोपर विधानसभा मतदार संघातील अनेक भागांत पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्यावेळी राम कदम यांनी संकल्प केला होता. जोपर्यंत या परिसरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, तोपर्यंत आपण केस कापणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती.
गेल्या चार वर्षांत राम कदम यांनी आपल्या संकल्पाचे पूर्णपणे पालन केले. त्यांच्या माहितीनुसार, परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी एक मोठी योजना राबवण्यात आली. या योजनेअंतर्गत सुमारे २ कोटी ७ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम सुरू झाले. या टाकीपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी भांडुपपासून सुमारे ४ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे घाटकोपर पश्चिममधील हजारो वस्त्या आणि सोसायट्यांना पाणीटंचाईतून दिलासा मिळाला आहे. लोकांना आता नियमित आणि पुरेसे पाणी मिळत आहे. हे यश मिळाल्यानंतर राम कदम यांनी आपले केस कापले.
यावेळी बोलताना राम कदम म्हणाले की, राजकारण केवळ सत्तेपुरते मर्यादित नाही, तर जनतेच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवणे हीच खरी जबाबदारी आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघातील नागरिकही भावूक झाले.