

Bhiwandi Mayor Power Shift: भिवंडीच्या राजकारणात आज अक्षरशः भूकंप झाला आहे. भिवंडी–निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपची समीकरणं कोलमडली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी पक्षाविरोधात बंड करत काँग्रेसप्रणीत ‘सेक्युलर फ्रंट’च्या मदतीने महापौरपद मिळवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं अंतर्गत राजकारण अखेर उघडपणे समोर आलं आहे. भाजपने ऐनवेळी चौधरी यांचं नाव बाजूला करुन स्नेहा पाटील यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. हा निर्णय चौधरींना मान्य नव्हता. नाराजी इतकी वाढली की त्यांनी आपल्या 7–8 समर्थक नगरसेवकांसह वेगळा गट तयार केला आणि थेट काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
या खेळीमुळे भाजपच्याच रणनीतीचा फटका भाजपला बसला आहे. महापालिकेतील आकडेमोड पाहिली, तर काँग्रेसकडे सर्वाधिक जागा आहेत, तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), समाजवादी पक्ष आणि स्थानिक आघाड्यांचे नगरसेवक अशी विभागलेली ताकद असताना, काँग्रेसने भाजपच्या बंडखोरांना सोबत घेत ‘सेक्युलर फ्रंट’ उभा केला आणि सत्तेची चावी आपल्या हातात घेतली.
काँग्रेस : 30
भाजपा : 22
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार): 12
शिवसेना (शिंदे गट):12
समाजवादी पक्ष :06
कोणार्क विकास आघाडी : 05
भिवंडी विकास आघाडी : 03
अपक्ष : 1
नारायण चौधरी :- 48
विलास पाटील :- 25
स्नेहा पाटील :- 16
विशेष म्हणजे भिवंडीत आजवर बहुतेक वेळा अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी महापौर होत आले आहेत. मात्र यंदा काँग्रेसने राजकीय गणित बदलत थेट भाजपच्या हिंदू चेहऱ्यालाच पाठिंबा दिला आहे. हा निर्णय केवळ महापौरपदापुरता मर्यादित नसून, आगामी राजकारणाची दिशा बदलणारा मानला जात आहे.
दरम्यान, भाजपमधील या बंडखोरीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, भाजप सोडून गेलेले लोक पक्षासाठी महत्त्वाचे नाहीत. जो विचारधारेपासून दूर जातो, तो भाजपचा राहत नाही. या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष योग्य निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
एकीकडे नव्या महापौरांचा शपथविधी, तर दुसरीकडे भाजपमधील नाराजी आणि कारवाई याची चर्चा रंगली आहे. भिवंडी महापालिकेतील हा सत्ताबदल आता फक्त स्थानिक राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. तो राज्याच्या राजकीय वर्तुळातही महत्त्वाचा ठरणार आहे.