

Bhagat Singh Koshyari on Raj Thackeray
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषिक हिंसाचाराच्या घटनांचा स्थानिक आजार असा उल्लेख केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे. देशभरात हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला शिकवा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भागवतांवर निशाणा साधला आहे. यानंतर आता महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना डिवचलं आहे.
"राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जास्तच घाबरले आहेत," अशी टीका महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यांनी मोदींना घाबरू नये तर त्यांच्या जवळ जावे, असा सल्ला देखील कोश्यारी यांनी राज ठाकरेंना दिला आहे.
संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित दोनदिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी भाषिक वादावर भाष्य केले होते. भाषिक भेदभाव आणि हिंसाचारच्या घटना या स्थानिक पातळीवर आजारासारख्या असून त्यांना सार्वत्रिक स्वरूप न देता समन्वय आणि सद्भाव कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यावर, मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाजमाध्यमात पोस्ट करत टीका केली होती. त्यांच्या टीकेला कोश्यारी यांनी खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले भगत सिंह कोश्यारी?
तीन वर्षांपूर्वी म्हणजेच १२ फेब्रुवारी २०२३ रोजी भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नाशिक येथे माध्यमांशी बोलतना कोश्यारी म्हणाले की, संघाच्या कार्यक्रमात आलेले लोक पंतप्रधान मोदींना घाबरून आले नव्हते. मी राज ठाकरे यांचा आदर करतो, ते मला धाकट्या भावासारखे आहेत. ते खूप चांगले नेते आहेत. पण मला वाटते की, राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी घाबरू नये, उलट मोंदीच्या जवळ गेलं पाहिजे. जसे प्रभू रामासाठी सर्व प्रजा समान होती, तसेच मोदी यांच्यासाठीही सर्वजण समान आहेत. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आहे, त्यामुळे येथे कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, असेही कोश्यारी म्हणाले. राज्यपाल असताना छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले होते.