

Sanjay Raut On Rohit Pawar Press: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटशन करून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित केलेल्या शंकेबाबत भाष्य केलं. त्यांनी हा मुद्दा मी संसदेत मांडला आहे. याची चौकशी व्हायला हवी अन् पूर्व विदर्भातील तो नेता कोण हे उघड झालं पाहिजे असं देखील राऊत म्हणाले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील एक मागणी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, 'रोहित पवारांचे संपूर्ण सादरीकरण मी पाहिलं. हा विषय मी स्वतः संसदेत मांडला होता. अजित पवार यांचा अपघात वाटत असला तरी ज्या पद्धतीनं अपघातानंतर आणि आधी २४ तासात घडामोडी घडल्या त्या पाहता संशयाला जागा आहे. मी संसदेत काही मुद्दे मांडले होते. रोहित पवार यांनी त्याहीपुढे जाऊन अनेक तांत्रिक मुद्द्याचा व्यवस्थित अभ्यास करून काल जे सादरीकरण केलं ते धक्कादायक आहे.'
रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याचा विचार महाराष्ट्रानं केला पाहिजे असं म्हणत राऊत यांनी अजित पवार यांचे दुर्दैवी मृत्यू हा महाराष्ट्रावर आघात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा समतोल त्यामुळं बिघडला आहे. त्यामागे काही सुनियोजित कट आहे का नाही तो आहेच.' असं वक्तव्य केलं.
ते पुढे म्हणाले, 'पवार कुटुंबातील एक महत्वाची व्यक्ती जी विधीमंडळात आहे त्यांनी हे पुराव्यानिशी दाखवून दिलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवार हे माझे मित्र होते त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका असं म्हणतात.
हे राजकारण नाही ही मागणी आहे संशय आहे. तुम्ही उलट यात पुढाकार घेऊन रोहित पवार जे सांगत आहेत त्या सर्व मुद्यांची चौकशी करायला पाहिजे.
प्रकरणाच्या तपासाबाबत राऊत म्हणाले, 'हे सीआयडी आणि अमुक तमुक चौकशी करणार नाहीत. तटस्थपणे चौकशी झाली पाहिजे. हा तांत्रिक, रहस्यमय आणि राजकीय विषय आहे.'
'आदल्या दिवशी एक विमान सुरतला जातं, ते दुसऱ्या दिवशी अजित पवारांना घेऊन बारामतीत येतं आणि ते विमान कोसळतं.'
रोहित पवार यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा उल्लेख आपल्या प्रेझेंटेशनमध्ये केला होता. त्याबाबत राऊत म्हणाले, 'पूर्व विदर्भातील ते नेते कोणत आहेत. ते भाजपचे आणि राष्ट्रवादीचे आहेत का जर ते पूर्व विदर्भातील नेते अजित पवार यांना मुद्दाम भेटले असतील आणि त्यांनी अजित पवार यांचा मोटारीनं जाण्याचा प्लॅन रद्द करायला लावला असेल तर असा नेता कोण त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तो कोणत्या पक्षाचा होता.'
राऊत पुढे म्हणाले, 'अशी काय घाई होती ती फाईल घेऊन गेले ती कोणती फाईल होती ज्यावर सही झाली नसती तर काय महाराष्ट्र थांबला असता का.
अजित पवारांनी सांगितलेल्या भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आहे असं सांगत होते. त्या फाईलचा ताबा घेण्यासाठी ते नेते तिथं थांबले होते का, ही फार गंभीर गोष्ट आहे.
चंद्रपूरमधील महापौर निवडीबाबतच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी, 'तुमच्यात एक वाक्यता नाही म्हणून तुम्हाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांना वेगळा निर्णय घ्यावा लागला. चंद्रपूरच्या निर्णयाचा इतर ठिकाणी देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आम्हाला यावर बसून निर्णय घ्यावा लागेल.' असे म्हणत काँग्रेसमधील अंतर्गत वादावर बोट ठेवलं.