

Ashish Shelar on Manoj Jarange Patil : "महायुती सरकारने नेहमीच मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. आमच्या सरकारने केवळ बोलघेवडेपणा केला नाही किंवा आम्ही कधीच कुंपणावर बसून काम केले नाही. आधीच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाचे आरक्षण टिकवले नाही; मग आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केले जात आहे?" असा थेट सवाल मंत्री आशिष शेलार यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज (दि. १६ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे निर्णय अन्य कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी घेतले नाहीत. तसेच महायुतीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीदेखील मराठा समाजासाठी निर्णय घेतले, असे सांगताना इतरांची नावे घेणे त्यांनी टाळले. आधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला मराठा आरक्षण टिकवता आले नाही, मात्र महायुतीने मराठा समाजासाठी प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे, असेही शेलार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या १४ पैकी १३ मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. असे असताना सणांच्या काळात मनोज जरांगे यांनी मुंबईला कूच करणे योग्य नाही. मनोज जरांगे यांना आमची विनंती आहे की त्यांनी मुंबईला येऊ नये, असे आवाहन मंत्री आशिष शेलार यांनी केले.
हिंदू सणांच्या काळात, विशेषतः मुंबई आणि पुणे येथे भाविक मोठ्या संख्येने गणेशोत्सवात सहभागी होत असतात. त्यामुळे कोणत्याही हिंदू सणांमध्ये विघ्न नको, असे सांगतानाच मंत्री शेलार यांनी मराठा समाजालाही नम्र आवाहन केले आहे. आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर अनेक अडचणी असू शकतील, त्याही आम्ही नक्की दूर करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.