

Amol Mitkari On Naresh Arora: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक ट्विट करून राज्याच्या राजकारणात एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पीआर सांभाळणारे नरेश अरोरा सध्या कुठं आहेत असा सवाल केला आहे. त्यांनी नरेश अरोरा यांच्या राष्ट्रवादीतील भूमिकेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, 'नरेश अरोरा हे राष्ट्रवादीचा पीआर सांभाळायचे. त्यांनीच दादांना गुलाबी जॅकेट दिलं. त्यांनी दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकला होता. संपूर्ण पक्षाची स्ट्रॅटजी ते ठरवायचे. दादांच्या निधनानंतर हे फक्त एक दोन दिवसच दिसले. आता ते कुठं आहेत? मला हा प्रश्न पडला म्हणून मी ट्विट केलं.'
अमोल मिटकरी पुढे जाऊन म्हणाले, नरेश अरोरा हे महाराष्ट्रात आहेत की देशाबाहेर आहेत याची माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर ते कुठं दिसलेच नाहीत. खरंतर आमच्या दुःखात त्यांनी सोबत रहायला हवं होतं. त्यांनी काही पोस्ट किंवा त्यांच्याबद्दल बोलायला हवं होतं. मात्र ते कुठं आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे.'
अमोल मिटकरी यांनी 'आता मी असं बोलल्यावर ते आमच्या नेत्यांना विचारतील की आपल्या पक्षाचा आमदार असा कसा बोलतोय. ते थोडे नाराज देखील होतील. मला काही त्यांचा फोन येत नाही मी त्यांना कधी फोन करत नाही. सभागृहात अजून अजित पवार यांच्या अपघातावर चर्चा नाही. आता दोन दिवस या आठवड्याचे शिल्लक आहेत. पुढच्या आठवड्यात देखील सुट्ट्या आहेत त्यानंतर अधिवेशन पूर्ण होईल. म्हणजे चर्चा घडवून आणायची नाहीये.' असं देखील वक्तव्य केलं.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत अमोल मिटकरी म्हणाले, 'रोहित पवार त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. विधानसबा निकाल लागल्यानंतर या अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला होता. पुष्पगुच्छ दिले होते. तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्ही सोल्जर नाही तर सॅलरी सोल्जर आहात. आता हे कुठं आहेत. व्हीएसआर बद्दल काही बोलत का नाहीत? जो रिपोर्ट आला त्याच्यावर काही कंटेट देण्याची जबाबदारी त्यांची होती. आता ते कुठं आहेत.
शेवटी अमोल मिटकरी यांनी, 'बहती हवा सा था वो, कहा गया उसे ढुंडो' असं म्हणत नरेश अरोरांच्या गायब होण्यावर सूचक टिप्पणी केली.