

Sandeep Deshpande Shivtirth Speech: "गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे ब्रँड संपल्याची चर्चा सुरू आहे. पण मी स्पष्ट सांगतो, ठाकरे हा ब्रँड नाही, तर तो एक विचार आहे. ब्रँड संपू शकतो, पण विचार कधीच संपत नाही," अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवतीर्थवरून विरोधकांवर घणाघात केला. जागा वाटपावरून संदीप देशपांडे नाराज असल्याची चर्चा होती.
ते भाजपमध्ये देखील प्रवेश करणार अशी देखील चर्चा होती. या सर्व पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आज शिवतीर्थावर भाषण करताना ठाकरे बंधुच्या सभेत आपल्याला भाषण करायला मिळालंय. याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता असं वक्तव केलं.
पंतप्रधान मोदींच्या 'ब्रँड'वर टीका करताना संदीप देशपांडे म्हटले की, "तुमचा गुजरातचा ब्रँड असेल, पण आमचा मराठी विचार आहे. लोकांनी १० वर्षे एकाच ब्रँडला कंटाळून आता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जसे लोक कोलगेट वापरून कंटाळले की ब्रँड बदलतात, तसेच या निवडणुकीत तुमचा ब्रँड बदलण्यासाठी आमचा 'ठाकरे विचार' कामी येईल."\
राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेवर तोफ डागताना संदीप देशपांडे म्हटले की, निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पैसे टाकण्याचे आमिष दाखवून भगिनींना भुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. "आमच्या भगिनी खूप हुशार आहेत. त्या नवऱ्याचा पगार खिशात घालूनही नवऱ्याला बधत नाहीत, मग तुमच्या पंधराशे रुपयांना त्या बधणार आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईवर अधिकार गाजवणाऱ्या परप्रांतियांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी कडक इशारा दिला. "मुंबईत येऊन कोणीही 'मुंबई महाराष्ट्राची नाही' असे म्हणू नये. अण्णा मलाई यांनी लुंगी डान्स करत मुंबईबद्दल जे विधान केले, त्यांना आमचा इशारा आहे— वेळीच सुधारा, नाहीतर 'हटाव लुंगी बजाव पुंगी' करायला आम्हाला वेळ लागणार नाही." तसेच, ही निवडणूक केवळ रस्ते-पाण्याची नाही, तर मराठी अस्मितेची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेच्या दयनीय अवस्थेवर भाष्य करताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एक महत्त्वाची विनंती केली. "महानगरपालिकेत सध्या ३० टक्के जागा रिक्त आहेत. जर दोन्ही नेत्यांनी ठरवले, तर सत्तेत आल्यावर कंत्राटी पद्धत बंद करून मुंबईतील किमान दीड लाख मराठी तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळू शकतो." तसेच, बेस्ट (BEST) उपक्रम महानगरपालिकेत विलीन करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी या ऐतिहासिक सभेत केली.