थर्टी फर्स्ट करा पण घरातच ! ठाकरे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी | पुढारी

थर्टी फर्स्ट करा पण घरातच ! ठाकरे सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणुच्या संसर्गवाढीचे राज्यावर मोठे संकट असून सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने साजरे करा, अशी सूचना राज्याच्या गृहविभागाने बुधवारी (ता.29) राज्यातील नागरिकांना केली आहे.

कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेवून नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने 31 डिसेंबर, 2021 (वर्ष अखेर) व नूतन वर्ष 2022 चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत रात्रीची संचारबंदी 25 डिसेंबरपासून लागू केली आहे. त्यानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे, असे मार्गदर्शक सूचनात म्हटले आहे.

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. खुल्या जागेवरील कार्यक्रम 25 टक्के तर बंदिस्त जागेवरील कार्यक्रम 50 टक्के क्षमतेत घेण्याचे निर्बंध लागू आहेत.

या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच या नियमांचे काटेकोर पालन करा, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

60 वर्षे वरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षाच्या आतील बालके यांना नव वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना शक्यतो घराबाहेर काढू नका. गिरगाव, वर्सोवा, दादर, मरिन लाईन्स, गेटवे येथे गर्दी करु नये. बागा, रस्ते येथे मोठ्या संख्येने गर्दी करु नये. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुक काढू नये, अशी तंबी गृहविभागाने दिली आहे.

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक धार्मिक स्थळी जातात, तेव्हा गर्दी करु नये तसेच योग्य ती खबरदारी घ्यावी. फटक्यांची आतषबाजी करु नये,ध्वनीप्रदुषणांच्या नियमांची काटेकोर काळजी घ्यावी, असे गृहविभागाच्या या परिपत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button