दिलीप वेंगसरकर : कोहलीच्या वादात गांगुलीचा हस्तक्षेप अवाजवी | पुढारी

दिलीप वेंगसरकर : कोहलीच्या वादात गांगुलीचा हस्तक्षेप अवाजवी

मुंबई ; वृत्तसंस्था : ‘संघ आणि कर्णधाराची निवड हा निवड समितीच्या अखत्यारीतील प्रश्न असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली याचा त्यातील हस्तक्षेप अवाजवी होता, त्याने गप्प बसायला हवे होते,’ असे परखड मत माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांनी मांडले आहे.

भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून विराटला हटवून रोहित शर्माला नवी जबाबदारी देण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. त्यानंतर विराट कोहलीचे चाहते काहीसे नाराज झाले. विराटनेही पत्रकार परिषद घेत या निर्णयावर थोडीशी नाराजी दर्शवली; पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याने निवड समितीची बाजू क्रिकेटप्रेमींसमोर मांडत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

गांगुलीने केलेला प्रयत्न कितपत सफल ठरला हे सार्‍यांनाच माहिती आहे. मात्र, सौरव गांगुलीच्या स्पष्टीकरणानंतर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर चांगलेच संतापले. ‘निवड समितीच्या वतीने सौरव गांगुलीने बोलण्याची गरजच नव्हती,’ असे रोखठोक मत त्यांनी मांडले.

‘विराट कोहलीच्या कर्णधारपदावरून जो काही वादंग झाला तो संपूर्ण प्रकार दुर्दैवी आहे. क्रिकेट मंडळाने असे संवेदनशील विषय थोडे नाजूकपणे हाताळायला हवे होते. शिवाय महत्त्वाचे म्हणजे, निवड समितीच्या वतीने बोलण्याचा सौरव गांगुलीचा काय संबंध? त्याने निवडकर्त्यांची बाजू फॅन्सपुढे मांडणे चूक आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आहे. संघ निवड किंवा कर्णधारपदावरून कोणत्याही प्रकारचा वाद चर्चिला जात असेल तर त्यावर निवड समिती अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे होते.

गांगुलीने त्यांची बाजू मांडल्यावर विराटनेदेखील त्याच्या बाजूने स्पष्टीकरण देणे स्वाभाविकच होते; पण मूळ मुद्दा असा आहे की, हा संपूर्ण वाद निवड समिती अध्यक्ष आणि संघाचा कर्णधार यांच्यामधला होता. त्यामुळे कर्णधाराची निवड असो किंवा त्याची हकालपट्टी असो, गांगुलीचा त्याच्याशी काहीही संबंध येत नाही. त्याने गप्प बसायला हवे होते,’ अशी तीव्र शब्दांत वेंगसरकर यांनी नाराजी व्यक्त केली.

Back to top button