

मुंबई/ठाणे ; पुढारी वृत्तसेवा
आरोग्य भरतीमधील पेपरफुटीवरून राज्यात वादंग माजले असतानाच आता म्हाडामधील नोकर भरतीसाठी होणारी परीक्षा मध्यरात्रीर रद्द झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी पोहोचले असतानाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द झाल्याचे ट्विट करून सांगितले आहे. आता ही परीक्षा जानेवारीत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे म्हाडाची आज होणारी परीक्षा आणि यापुढे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा जानेवारी महिन्यात होतील. परत एकदा क्षमा मागतो.
तत्पूर्वी, नोकरी लावून देण्यासाठी पैसे घेणार्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी म्हाडाच्या भरती परीक्षा ही पूर्व परीक्षा गृहीत धरण्यात येणार असून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा घेतली जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी केली होती.
परीक्षा होण्यापूर्वीच काही उमेदवारांकडून पैसे घेऊन नोकरी लावणार्या दलालांचे रॅकेट सक्रिय झाल्याच्या तक्रारी आव्हाड यांच्याकडे आल्या. म्हाडाच्या परीक्षा देणार्या परीक्षार्थींनी नोकरीसाठी पैसे मोजावे लागणार म्हणून कर्ज काढले, जमिनी विकल्या, काहींनी तर मंगळसूत्रे गहाण ठेवून दलालांना पैसे दिले आहेत. तशी माहिती गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी दिली होती.
हे ही वाचलं का ?