चीन बनवत आहे ‘हायपरसोनिक’ विमान! | पुढारी

चीन बनवत आहे ‘हायपरसोनिक’ विमान!

बीजिंग : चिन्यांची नक्कल करण्याची सवय जुनीच आहे. एखाद्या उत्पादनाची नक्कल करून तशी उत्पादने तयार करणे आणि जगभर स्वस्तात खपवणे हा तर चिनी धंदाच आहे. आता चीनने अमेरिकेचे तंत्र चोरून चक्क ‘हायपरसोनिक’ म्हणजे अतिवेगवान विमान बनवण्याची जय्यत तयारी केली आहे. असे विमान जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात तासाभरातच जाऊ शकते.

या हायपरसोनिक विमानातून केवळ दहा लोक प्रवास करू शकतात. हे विमान ताशी बारा हजार मैल वेगाने उडू शकते. या सुपरप्लेनचे प्रोटोटाईप छायाचित्रामधून पाहता येते. त्याचे डेल्टा विंग्ज हे सामान्य विमानांच्या पंखांपेक्षा वेगळे आहेत. या विमानात वापरण्यात आलेल्या एरोडायनॅमिक डिझाईनमुळे ते ध्वनीच्या वेगापेक्षाही पाच पट अधिक वेगाने उडू शकते.

भविष्यात अशा विमानात शंभर सीटर बनवण्याचीही योजना आहे. सध्या मात्र ते दहा लोकांनाच वेगाने इष्टस्थळी पोहोचवू शकते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार हे विमान 2025 पर्यंत लोकांच्या सेवेसाठी येईल. ते ‘बोईंग 737’ पेक्षाही मोठे असेल आणि त्यामध्ये दोन एअर इंजिन्स असतील. विशेष म्हणजे या सुपरप्लेनचे डिझाईन वीस वर्षांपूर्वीच ‘नासा’च्या एका मुख्य अभियंत्याने तयार केले होते.

मात्र, त्यावेळी अमेरिकन सरकारने त्याला महागडे ठरवून बाजूला ठेवले होते. 1990 च्या दशकात मिंग हान टंग्सने त्याच्या डिझाईनवर काम सुरू केले. मात्र, ते पुढे जाऊ शकले नाही. अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेने नाकारलेल्या या विमानावर चीनने पुन्हा काम सुरू केले आणि आता लवकरच ते वास्तवात उतरलेले दिसू शकते. चीनमध्ये या विमानाच्या चाचण्याही सुरू झालेल्या आहेत.

Back to top button