पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी यांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका भामट्याने विनोद कांबळी याची एक लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केली. वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.
केवायसी अपडेटच्या नावाखाली विनोद कांबळी यांची १,१३,९९८ रुपयांची फसवणूक झाली. हे संपूर्ण प्रकरण ३ डिसेंबरचे असल्याचे सांगितले जात आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले होते. केवायसी माहिती अपडेट करता यावी म्हणून कांबळीला त्याचे बँक तपशील विचारण्यात आले. फसवणूक करणाऱ्याला याची माहिती मिळताच त्याने खात्यातून एक लाखाहून अधिक रक्कम काढून घेतली.
वांद्रे पोलिसांना तक्रार मिळताच सायबर पोलिस आणि बँकेच्या मदतीने पैसे परत घेतले. पोलिस अधिक तपास करत आहेत. विनोद कांबळी म्हणाले की, "फोनवर अलर्ट मिळाल्यानंतर मी ताबडतोब माझ्या बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल केला आणि खाते ब्लॉक केले. त्यानंतर मी पोलिसात पोहोचलो. माझे पैसे परत मिळवून देण्यात मला मदत केल्याबद्दल मी पोलिसांचा आभारी आहे". असेही कांबळी म्हणाले आहेत.