अण्णा हजारेंनी सांगितलं कोणाला मतदान द्यायचं? म्हणाले… | पुढारी

अण्णा हजारेंनी सांगितलं कोणाला मतदान द्यायचं? म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्यात आज देशात मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ मतदार संघातही मतदान सुरू आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अहमदनगर येथील राळेगणसिद्धीमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी देशाला उज्वल भविष्य द्यायचे असले तर चारित्र्यवान उमेदवाराला मतं द्या, असे मतदारांना आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणूक ठळक मुद्दे :

  • लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात ९६ जागांसाठी १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
  • आज चौथ्या टप्प्यात ९ राज्ये, १ केंद्रशासित प्रदेशातील ९६ जागांवर मतदान सुरू आहे.
  • या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 969 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिले आहेत.
  • मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत.
  • या टप्प्यात अनेक दिग्गज उमेदवारांची आणि राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अण्णांचे मतदारांना आवाहन

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या लाखो लोकांची आठवण ठेवा. देशाला उज्वल भविष्य द्यायचे असले तर चारित्र्यवान उमेदवाराला मतं द्या, असे मतदारांना आवाहन अण्णा हजारे यांनी केले आहे. मतदान करताना ज्याचे आचार, विचार शुद्ध आहेत, ज्याचे जीवन निष्कलंक आहे, त्यांनाच मतदान करा. १० रूपये, १०० रूपये घेवून मतदान करणारा दोषी आहे. पैसे वाटप करणाऱ्यांना मतदान करू नका, असे अण्णांनी म्हटले आहे. संविधान कोणी बदलू शकत नाही. स्वांतंत्र्याची ७५ वर्ष देश गुण्यागोविंदाने राहत आहे त्याचं कारण संविधान आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल पुन्हा जेलमध्ये जाणार

तुम्ही सर्वांनी आम आदमी पक्षाला मतदान केले, तर मला तुरुंगात जावे लागणार नाही, असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी प्रचारादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा होत असतानाच अण्णा हजारे यांनी केजरीवाल पुन्हा जेलमध्ये जातील, असे वक्तव्य केले आहे. केजरीवाल अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. दिल्ली आणि पंजाबच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रोड शो आणि बैठकांचा धडाका लावला आहे. रविवारी त्यांनी दिल्लीत रोड शो केला. यावेळी मतदारांना आवाहन करताना, मला २० दिवसांनंतर तुरुंगात परत जावे लागेल. जर तुम्ही झाडूला (आपचे चिन्ह) मतदान केले तर मला पुन्हा तुरुंगात जावे लागणार नाही, असे म्हटले होते.

हेही वाचा : 

Back to top button