जळगाव : पुढारी वृत्तसेवा- खानदेशामधील महत्त्वपूर्ण असलेल्या तीन जिल्ह्यांमधील जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील दोन जागांचा गड राखण्यात भाजप यशस्वी झालेला आहे. मात्र धुळे, नंदुरबार हा भाजपचा गड काँग्रेसने पुन्हा आपल्या ताब्यात घेतल्यामुळे गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसलेला आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबारमधील सर्व जागा भाजप जिंकणार, असा दावा करणारे राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन यांना जळगावनेच तारले आहे. मात्र धुळे, नंदुरबारला पाहिजे तसे यश त्यांना मिळू शकले नाही. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर भाजपने विजय जरी मिळवला असला तरी 2019 च्या तुलनेत यंदा दोन्ही उमेदवारांचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपला पुन्हा जळगावात चिंतन शिबिर करावे लागणार आहे की मतदार अचानक भाजपपासून का दूर गेला व हा लीड का कमी झाला, याचा विचार करावा लागणार आहे.
जळगावमध्ये झालेले बदल आगामी काळात तेथे मोठ्या घडामोडी घडविणार असल्याचे संकेत मिळत आहे. भाजपच्या नेतृत्वावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. ज्या ठिकाणी पाच लाखांचा लीड मिळणार असे दावे करण्यात येत होते, तेथे अडीच लाखांचा लीड घेता घेता दमछाक झाली आहे. उमेदवारांनी सुरुवातीपासून तरी आघाडी घेतलेली असली तरी ते गेल्या निवडणुकीचा रेकॉर्ड ब्रेक लीड तोडू शकलेले नाही.
खानदेशामधील लागलेल्या धक्कादायक निकालानंतर गिरीश महाजन माध्यमांना कोणताही प्रतिक्रिया न देता विमानाने थेट मुंबईकडे रवाना झाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली. पत्रकारांनी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता कुठलीही प्रतिक्रिया न देता गिरीश महाजनांनी तातडीने विमानतळ गाठले आणि ते मुंबईकडे निघून गेले. जळगाव विमानतळावरून विमानाने गिरीश महाजन मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी माहिती दिली.
——–