मिशन २०२४! ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला | पुढारी

मिशन २०२४! ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीला

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाल्या. यावेळी पवार यांच्यासह मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, रामराजे ना. नाईक, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुखांच्या भेटी घेत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पश्चिम बंगाल नंतर ममतांनी आता अन्य राज्यांत तृणमूलच्या प्रचारावर जोर दिलाय. नुकताच त्यांनी गोवा दौरा केला. तेथ त्यांनी वेगळी रणनिती आखली आहे. याच दरम्यान ममता आज शरद पवारांना भेटल्या.

तृणमूल पक्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत केवळ पश्चिम बंगाल पुरता मर्यादित राहणार नसल्याचे संकेत ममतांनी नुकतेच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची त्यांनी घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. दरम्यान, शरद पवार आणि ममतांच्या भेटीचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे की काँग्रेस शिवाय विरोधी पक्षांची एकजूट होऊ शकत नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर ममता पत्रकार परिषद घेऊन भेटीचा उद्देश स्पष्ट करतील.

तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्षाला तसा अधिकार आहे. मात्र, काँग्रेसला बाजुला ठेवून भाजप विरोधात विरोधी पक्षांची एकजूट करणे अशक्य असल्याचा सूर नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

Back to top button