पुणे : पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्यावेळी घेतलेल्या शपथविधीचा पश्चाताप होत असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर खोचक प्रतिक्रीया व्यक्त करताना राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी, ''चिडिया चुग गई खेत अब पछताए का होय'' असा चिमटा काढला आहे. पुण्यात श्रमिक पत्रकारसंघाच्या वार्तालापात ते बोलत होते.
ते म्हणाले, 'फडणविसांना सत्तेशिवाय राहताच येत नाही हेच त्यांनीदोन वर्षांपूर्वी सिद्ध केले. आगदी काहीदिवसांपूर्वीपर्यंत आपण मुख्यमंत्री नाही आहोत यावर अद्याप विश्वासच बसत नाही' असे म्हटले होते. आता त्यांनी वास्तव स्विकारलेले दिसते आहे', असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपातील फडणवीसांच्या विरोधकांना बढती मिळाली आहे. तावडेंना आता थेट पंतप्रधानांशी बोलता येणार आहे. यावरून फडणवीसांची पक्षातील किंमत कमी होत आहे, असेही मलिक म्हणाले.
मी पुराव्याशिवाय एकही आरोप केलेला नाही. मी शाहरूख खानची वकीली केलेली नाही, अन्यायाविरोधात लढलो. 'बॉलिवूड' योगीबाबाच्या राज्यात नेण्यासाठी राज्याला व चित्रपट सृष्टीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. नाव, जात, धर्म न बदलता मुंबईत अभिनेते मोठे झाले. बिहारच्या निवडणुका जिंकण्यासाठी सुशांतसिंग रजपूत प्रकरण समोर आणले, असा आरोप मलिक यांनी केला.
ते म्हणाले, 'वाझेच्या घरात एनआयएला बनावट पासपोर्ट सापडला आहे, हे एनआयए ने जाहीर करायला हवे. परमबीरसिंह आणि सचिन वाझे यांच्याकडून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना चुकीचे ब्रीफींग केले जात होते. सत्य समोर आल्यावर परमवीरसिंह यांची बदली केली. नंतर त्यांनी आरोप केले, फरार झाले, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सरकारी अधिकारी हे सरकारी असतात, ते कोणत्याही सरकारचे नसतात. परमबीरसिंह यांच्यावर सीआयडीने पाच गुन्हे दाखल केले आहेत, त्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आम्ही केंद्रासारखे दबावाचे काम करत नाहीत. परमबीरसिंहांना निलंबीत करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यांना सध्या उच्च न्यायालयाने संरक्षण दिले आहे.'
एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला हवा, त्यानुसार सरकारने वेतन वाढीचा निर्णय घेतला आहे. नियमीत पगार व बोनसची हमी दिली आहे. कोणतेही सरकार विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकत नाही. मात्र भाजप नेते दिशाभूल करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्था तिनही पक्षांनी एकत्रीत लढवाव्यात ही आमची इच्छा आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील दूरावा दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. प्रत्येक पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे. मुंबई दौऱ्यावर येणाऱ्या पश्चिम बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्या दुपारी ३ वाजता शरद पवार यांना भेटणार आहेत, ही सदीच्छा भेट असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.