Lok Sabha Election 2024 | कोल्हापुरात शाहू महाराजांना ‘वंचित’चा पाठिंबा : डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा | पुढारी

Lok Sabha Election 2024 | कोल्हापुरात शाहू महाराजांना 'वंचित'चा पाठिंबा : डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदार संघात शाहू छत्रपती यांना वंचितचा पाठिंबा असेल अशी मोठी घोषणा आज (दि.२३) पत्रकार परिषदेत वंचितचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, “आमचं टार्गेट भाजप आहे.” (Lok Sabha Election 2024)

Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसला  सात जागांवर पाठिंबा देणार

महाविकास आघाडीत पाच जागांवरील तिढा अद्याप आहे. त्यांच्यामध्येच अजून जागा वाटपाचे ठरत नाही तर, आम्ही आघाडीत येवून काय करणार? असा सवाल करत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. आता २६ मार्च पर्यंत आम्ही आमची भूमिका मांडू. तोपर्यंत आघाडीने निर्णय घ्यावा. असे आवाहन डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. पुढे बोलताना ते म्हणाले कॉंग्रेसला आम्ही सात जागांवर पाठिंबा देणार. कॉंग्रसेने त्यांच्या सात जागा आम्हाला कळवाव्या.

पुढे बोलताना डॉ. प्रकाश आंबेडकर म्हणाले,  प्रकाश शेंडगें यांच्याकडुनही युतीचा प्रस्ताव आला आहे. आता आम्ही २६ मार्च पर्यंत महाविकास आघाडीच्या निर्णयाची वाट पाहू. त्यांच्यामध्ये कोणता तिढा आहे, हे आम्हाला माहित नाही. त्यांच्यातील वाद मिटलेले नाहीत. कॉंग्रेसला कोणत्या सात जागांवर पाठींबा हवा आहे, हे आम्हाला त्यांनी कळवावे, आम्ही त्यांना पाठींबा देवू. असेही यावेळी त्यांनी स्पष्ट करत म्हणाले, आमचं टार्गेट भाजप आहे.

शाहू महाराज यांनी मानले आभार

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना दिलेल्या पाठिंब्याचे शाहू महाराज यांनी X वर पोस्ट करत आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडीतही आपण सहभागी व्हावे : सतेज पाटील

दरम्यान कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे, ” आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. प्रकाश आंबेडकरजी आपले धन्यवाद . समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल. तसेच राज्यात महाविकास आघाडीतही आपण सहभागी व्हावे, ही अपेक्षा.

आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर चर्चेला उधाण आलं आहे. राजकीय वर्तुळाचे वंचितच्या भुमिकेकडे लक्ष लागून राहीले आहे.

हेही वाचा 

Back to top button