Lok Sabha Election 2024 | नंदुरबारच्या आखाड्यात डॉक्टर विरुद्ध वकील लढत | पुढारी

Lok Sabha Election 2024 | नंदुरबारच्या आखाड्यात डॉक्टर विरुद्ध वकील लढत

नंदुरबार : योगेंद्र जोशी

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी मंत्री के. सी. पाडवी यांचे चिरंजीव ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी घोषित केली आहे. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना भाजपने आधीच उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात या दोन तरुण वकील-डॉक्टर उमेदवारांमधील लढत रंगणार असे चित्र निर्माण झाले आहे. Lok Sabha Election 2024

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात हीना गावित यांना काँग्रेसचे पाडवी हे टक्कर देणार आहेत. एकेकाळी काँग्रेसचे प्रमुख स्तंभ राहिलेले माजी मंत्री स्वरूपसिंग नाईक यांचे चिरंजीव तथा नवापूरमधील काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांचे नाव या संदर्भाने चर्चेत होते. रजनी नाईक यांचेही नाव पक्षाच्या विचाराधीन असल्याचे सांगितले जात होते. रजनी या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत. परंतु नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अत्यंत नवा कोरा तरुण चेहरा देण्याचा नवा प्रयोग हाती घेत काँग्रेसने ॲड. गोवाल यांचे नाव घोषित करून एक प्रकारे सर्वांना धक्का दिला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाकडून अशा अत्यंत नव्या कोऱ्या चेहऱ्याला उमेदवारी देण्याचे प्रथमच घडले आहे. परिणामी हा प्रयोग यंदाच्या निवडणुकीतील निराळे वैशिष्ट्य ठरू शकतो. पाडवी हे काँग्रेसचे उमेदवार म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे शरद पवार गटाचे आणि उद्धव गटाचे बळ त्यांना लाभणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडीचे हे दोन्ही घटक पक्ष येथे अत्यंत क्षीण स्वरूपात आहेत. काँग्रेसमधून माजी मंत्री पद्माकर वळवी, तर उद्धव गटातून विधान परिषद सदस्य आमशा पाडवी याच आठवड्यात पक्षाबाहेर पडले असून, त्यामुळे महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दरम्यान, भाजपमधील आणि अन्य सर्व पक्षांतील गावित परिवाराच्या विरोधकांनी एकत्र येऊन एक फोरम स्थापन केला होता. आज त्यातल्या अर्ध्याहून अधिक नेत्यांनी डॉ. गावित यांना जाहीर विरोध करणेही बंद केलेले आहे. त्या विरोधकांचे छुपे बळ ॲड. गोवाल यांना लाभेल किंवा नाही, हे आज तरी स्पष्ट नाही. परिणामी जवळपास स्वबळावर काँग्रेसला ही लढत द्यावी लागेल असे चित्र निर्माण झाले आहे. Lok Sabha Election 2024

चिरंजीवाच्या भवितव्याची मुहूर्तमेढ

के. सी. पाडवी यांनी आपल्या चिरंजीवाच्या राजकीय भवितव्याची मुहूर्तमेढ या माध्यमातून रोवून घेतली, असा सूर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावला आहे. मात्र खासदार डॉ. हीना गावित विरुद्ध ॲड. गोवाल पाडवी या तरुण उमेदवारांची लढत रंगतदार होणार का त्याबद्दलची उत्सुकता ताणलेली आहे.

हेही वाचा :

Back to top button