डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटलांनी बांधले शिवबंधन : ठाकरे गटात प्रवेश | पुढारी

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटलांनी बांधले शिवबंधन : ठाकरे गटात प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी आज (दि. ११)  शेकडो कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधले. मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. दुपारी सांगली जिल्ह्यातून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले होते.गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

हा शेतकर्‍याच्‍या मुलाचा सन्‍मान

आज खर्‍या अर्थाने एका शेतकर्‍याच्‍या मुलाचा सन्‍मान झाला आहे. मला शिवसेनेच्‍या माेठ्या परिवारात सहभाग करुन घेतल्‍याबद्‍दल मी आभार मानताे, असे  चंद्रहार पाटील यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी केली चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर

चंद्रहार यांच्‍यासह सर्वांचे मी मातोश्रीवर स्‍वागत करतो. आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. चंद्रहास सारखा पैलवान असला तर सांगलीसह महाराष्‍ट्रात आपल्‍या रिुद्‍ध कोणी लढणयाची हिंमत करणार नाही. नामर्द पळून जात आहेत तर मर्द शिवसेनेत येत आहेत, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. गदा आणि मशाल घेवून एक मर्द आम्‍ही दिल्‍लीला पाठविणार आहाेत, असे सांगत त्‍यांनी सांगली लाेकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. सांगली शिवसेना ठाकरे गटाच्‍या संघटकपदी चंद्रहार पाटील यांची नियुक्‍ती केल्‍याचेही ठाकरे यांनी जाहीर केले.

लोकसभेच्या आखाड्यात उतरणार यावर चंद्रहार पाटील पहिल्यापासून ठाम आहेत. गेल्या वर्षभरापासून ते लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा अगोदरच व्यक्त केला होता. (Chandrahar Patil)

लोकसभा लढवायचा निर्णय पक्का केल्यानंतर त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाटी घेऊन चर्चा केली होती. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता. मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकीटाची हमी मिळाल्याशिवाय पक्ष प्रवेश करायचा नाही, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी पक्ष श्रेष्ठींसोबत दोन-तीन चर्चेच्या फेर्‍या केल्या. मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्याशीही त्यांच्या वारंवार चर्चा होत होत्या.

अखेर शनिवारी पुण्यात खासदार राऊत यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर पाटील यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. (Chandrahar Patil)त्यानंतर पाटील यांनी मतदारसंघात परत येऊन प्रवेशाची तयारी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्याशी चर्चा करुन त्यांनी आज प्रवेश निश्चित केला. जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना तसे निरोप देण्यात आले. दुपारी मातोश्रीवर त्यांचा पक्ष प्रवेश झाला. (Chandrahar Patil)

हेही वाचा : 

Back to top button