आयटीआयमध्ये वर्षभरात २५७ विद्यार्थ्यांचे धर्मांतर; अहवाल विधिमंडळात सादर

File Phto
File Phto

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध औद्यागिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) गेल्यावर्षी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकूण २५७ विद्यार्थ्यांनी आपल्या धर्माऐवजी अन्य धर्माची नोंद केल्याची धक्कादायक माहिती यासंदर्भातील आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा अहवाल राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या धर्मांतरणाबाबतचा अहवाल सादर केला आहे.

राज्यातील काही आदिवासी व्यक्तींनी आपल्या धर्माचा त्याग करून इतर धर्म स्वीकारला असतानाही आदिवासी विभागाला मिळणारे लाभ घेतले असल्याचे प्रकरण नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काही आमदारांनी उपस्थित केले होते.

आयटीआयमध्ये बोगस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचा आरोप आमदारांनी लक्षवेधीच्या माध्यमातून केला होता. त्यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी चौकशी समितीची घोषणा केली होती. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत प्रतिभा मसराम, किरण गभाळे यांचा समावेश करण्यात आला होता. या समितीने आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच सामाजिक न्याय विभाग यांचेमार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांची यादी आणि प्रवेशाची नियमावली माहिती तपासून आणि गॅझेटच्या उपलब्ध माहितीनुसार वरील बाब समोर आली आहे.

या अहवालानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या १३ हजार ८५८ इतक्या विद्यार्थ्यांची माहिती तपासली असता २५७ प्रकरणी प्रशिक्षणार्थ्यांनी इतर धर्म नोंदविला आहे. त्यात बुद्धिस्ट ४, मुस्लिम ३७, ख्रिश्चन ३, नॉट अव्हेलेबल २२, इतर १९०, शिख १ अशा एकूण २५७ जणांचा समावेश आहे. या समितीने उपाययोजनाही सुचविल्या आहेत. त्यात प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी धर्म बदलला असेल तर त्यांना आदिवासींना मिळणाऱ्या सवलती ग्राह्य राहतील काय? याबाबत समितीने सर्वंकष अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे. अशा प्रकारची बाब पहिल्यांदाच घडल्याने काय निर्णय घेण्यात येईल याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news