आईने मोबाईलच्या साहाय्याने शोधला बाळामधील कर्करोग

आईने मोबाईलच्या साहाय्याने शोधला बाळामधील कर्करोग

लंडन : कर्करोग हा असा गंभीर आजार आहे ज्याचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आता एका महिलेने आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने बाळाच्या डोळ्यातील कर्करोगाचा छडा लावला. त्यामुळे तिच्या या बाळाला लवकर उपचार मिळाले व ते बरे झाले.

सध्या स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन गरजेचीच वस्तू बनलेला आहे. मात्र, लोक त्याचा कसा वापर करतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. या महिलेने स्मार्टफोनचा सदुपयोग करून आपल्या बाळावरील मोठे संकट टाळले. सारा हेजेस असे या महिलेचे नाव आहे. एके दिवशी सारा रात्रीच्या जेवणाची तयारी करीत होती. अचानक तिचे लक्ष आपल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या डोळ्याकडे गेले. थॉमस नावाच्या या मुलाच्या डोळ्यात काहीतरी वेगळेच असल्याचे तिला आढळले. हा भाग पांढरट आणि चमकणारा होता. साराने यानंतर स्मार्टफोन उचलला आणि फ्लॅश लाईटचा वापर केला. त्यानंतर तिने त्याचे काही फोटोही टिपले.

हे नेमके काय आहे त्याची माहिती जाणून घेण्यासाठी तिने इंटरनेटची मदत घेतली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर तिला समजले की हा कर्करोगाचा प्रकार असू शकतो. त्यानंतर ती डॉक्टरांकडे गेली आणि तिथे ही एका दुर्मीळ कर्करोगाची सुरुवात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिच्या बाळाला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले व तिथे त्याच्यावर योग्य उपचारही झाले. डोळ्यांचा कर्करोग हा अत्यंत दुर्मीळ असा प्रकार आहे. त्याचा फैलावही झपाट्याने होत असतो. केमोथेरपीच्या अनेक फेर्‍यांनंतर आता थॉमस बरा झाला आहे. त्याच्या आईने तत्परता दाखवल्याने त्याचे प्राण वाचले!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news