Supriya Sule vs Chitra Wagh : ‘तुतारी’, भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा | पुढारी

Supriya Sule vs Chitra Wagh : 'तुतारी', भाजपद्वेषाची जुनी पिपाणी...चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने हे चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. ‘तुतारी’ पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत म्हटले होते की ” महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.” दरम्यान भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी एक कविता ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. ( Supriya Sule vs Chitra Wagh)

 Supriya Sule vs Chitra Wagh : तुतारी; भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर  एक कविता ट्विट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी कवितेमध्ये म्हटलं आहे की,

“ओ मोठ्ठ्या ताई, सुप्रिया सुळे…

तुतारीतुनी थकाल वाजवुनी

भाजपद्वेषाची जुनी पिपाणी…

करा कितीही खोटे पेरणी

परि जनतेच्या ना पडेल पचनी..

उंटावरली उगा अनेक शहाणी

पोकळ बडविती नगारखानी..

लवकरच तुम्हा पाजू पाणी

सज्ज आम्ही आहो युद्धरणीं…”

रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज : सुप्रिया सुळे

‘तुतारी’ चिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी कवी केशवसूत यांची कविता शेअर करत आपल्या ‘X’ अकाउंटवर पोस्ट करत म्हटले आहे, “नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले आहे. ही तुतारी अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचा संदेश देते. महाराष्ट्राला झुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘महाराष्ट्रद्रोही’ प्रवृत्ती, तरुणांचे रोजगार शेजारच्या राज्याच्या झोळीत अलगद नेऊन टाकणारे आणि राज्याचा सामाजिक सलोखा ढळावा यासाठी सतत काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात संघर्ष करण्याची हाक ही तुतारी देते. मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी शेतकरी आणि महिलांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या त्रिसूत्रीचा अवलंब करुन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कवीवर्य केशवसूत म्हणतात त्याप्रमाणे – ‘हल्ला करण्या ह्या दंभावर, ह्या बंडावर शुरांनो! या त्वरा करा रे! समतेचा ध्वज उंच धरा रे! नीतीची द्वाही पसरा रे! तुतारीच्या ह्या सुराबरोबर’ सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडऊनी!”

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावे आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. या निर्देशांचे पालन करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह दिले. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’च्या वतीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या चिन्हाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.

हेही वाचा 

Back to top button