दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसला देशातील गरिबी हटविता आली नाही : जे. पी. नड्डा | पुढारी

दीर्घकाळ सत्तेत राहूनही काँग्रेसला देशातील गरिबी हटविता आली नाही : जे. पी. नड्डा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर खर्‍या अर्थाने देशातील गरिबी हटवण्याचे कार्य केल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी केला. पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंडित नेहरूंनी नऊवेळा आणि इंदिरा गांधींनी चारवेळा गरिबी हटवण्याची भाषा केली. मात्र, दीर्घकाळ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला देशातील गरिबी हटवता आली नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नड्डा दोन दिवसांच्या मुंबई दौर्‍यावर आले आहेत. गुरुवारी सायन-कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील महिला लाभार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. नड्डा म्हणाले, देशात स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ काँग्रेसने राज्य केले. गरिबी हटवण्याचा केवळ घोषणा दिल्या.

त्यामुळे भारतातील गरीब कधीच संपन्न झाला नाही. 2014 नंतर हे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. विविध योजनांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरिबांना ताकद दिली. गरिबी हटविण्याची गॅरंटी घेतली. 55 कोटी गरिबांची बँकेत मोफत खाती उघडली. साडेबारा कोटी लाभार्थ्यांना शौचालये मिळाली. उज्ज्वला योजनेंतर्गत 10 कोटी घरांत गॅस पोहोचला. त्यातील 48 लाख लाभार्थी महाराष्ट्रातील आहेत. आयुष्मान भारत ही जगातील सगळ्यात मोठी आरोग्य योजना आणली, असे त्यांनी नमूद केले.

25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

लाभापासून वंचित राहिलेल्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विकसित भारत यात्रा सुरू आहे. मोदी गॅरंटीमुळे देशातील 25 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत निर्मितीचे काम सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Back to top button