माेठी बातमी : अशोक चव्‍हाण यांच्‍या भाजप प्रवेशाचा ‘मुहूर्त’ ठरला, ‘या’ तारखेला करणार पक्ष प्रवेशाची घाेषणा | पुढारी

माेठी बातमी : अशोक चव्‍हाण यांच्‍या भाजप प्रवेशाचा 'मुहूर्त' ठरला, 'या' तारखेला करणार पक्ष प्रवेशाची घाेषणा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते, माजी मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या  उपस्‍थितीत ते गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी भाजपमध्‍ये प्रवेश करणार असल्‍याचे वृत्त ‘पुढारी न्‍यूज’ने दिले आहे. ( Ashok Chavan will join BJP on February 15 )

आज सकाळी अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्‍याचे वृत्त समोर आले. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. अखेर आता ते १५ फेब्रुवारी राेजी भाजपमध्‍ये प्रवेश करतील, असे मानले जात आहे.

Image

‘मी १२ फेब्रुवारी रोजी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करत आहेत.’ असे अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांनी आपल्या नावासमोर माजी विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. याआधी शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले आणि भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीतही उभी फूट पडली. अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. आता राज्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. अशोक चव्हाण आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेसला तिसरा मोठा धक्का

अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यांतील काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. यामुळे केवळ दोन महिन्यांच्या आत काँग्रेसला तिसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर नुकताच माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडल्याचे वृत्त आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात- फडणवीस

काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहे. जनतेचे नेते भाजपकडे येतील. असा मला विश्वास आहे. आगे आगे देखो होता है क्या?, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जे जनतेचे नेते आहेत त्यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. ते भाजपमध्ये येत आहेत. पीएम मोदींच्या नेतृत्त्वात देश प्रगती करत आहे. त्यासाठी प्रगतीच्या प्रवाहात येण्यासाठी अनेक नेते उत्सुक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबाबत पत्रकार परिषदेत विचारले असता फडणवीस म्हणाले, ‘हे मी तुमच्याकडून ऐकले.’

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले…

अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे. ते विधानभवनात राजीनामा देण्यासाठी गेल्याची माहिती आहे. पण अधिकृत माहिती नाही. ज्या पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदापर्यंत नेलं, तिथे अस्वस्थ राहण्याचं कारण नाही. ते भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं मी स्वागत करतो, असे भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. भाजपला कोणाचीही गरज नाही, पण ज्यांना गरज आहे, ते भाजपमध्ये येतात, असेही चिखलीकरांनी सांगितले. अशोक चव्हाण विधानभवनात राजीनामा देण्यासाठी आले होते. म्हणजे नक्कीच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असे मला वाटते. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत. भाजप नांदेडमध्ये अगोदरपासूनच बळकट आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये येण्याने आणखी बळकटी मिळेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी खासदार मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांचा हा प्रवेश शिंदे गटासाठी फायदेशीर असून दक्षिण मुंबईतील शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. देवरा यांच्या रूपाने शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीसाठी तगडा उमेदवारही मिळाला. याचा फायदा लोकसभेसाठीच नाही तर विधानसभा व मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला होण्याची शक्यता आहे.

 

Back to top button