Shikshak Bharti 2024 : प्राधान्यक्रम लॉक न केल्यास शिक्षक भरती प्रक्रियेपासून राहावे लागणार दूर | पुढारी

Shikshak Bharti 2024 : प्राधान्यक्रम लॉक न केल्यास शिक्षक भरती प्रक्रियेपासून राहावे लागणार दूर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल काल दिवसभर अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक झाले नाहीत. मात्र प्राधान्यक्रम लॉक केल्याशिवाय उमेदवारांना पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत. प्राधान्यक्रम ऑनलाइन लॉक करण्याची सुविधा १२ फेब्रुवारीपर्यंत असून, उमेदवारांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करणे आवश्यक असल्याचे या सूचनांमध्ये म्हटले आहे. (Shikshak Bharti 2024)

शिक्षक भरतीसाठी दोन लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार अभियोग्यता धारकांनी पसंतीक्रम नोंदवले आहेत. मात्र काही उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत आहेत. उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यास वेळ मिळावा यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पसंती क्रम न नोंदवले गेलेल्यांनी नियोजित कालावधीत पसंतीक्रम नोंदवणे अपेक्षित आहे. वय जास्त असल्याने काही उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध झालेले नाहीत. अशा उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांतील नववी ते दहावी आणि अकरावी व बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारांनी प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्राधान्यक्रम लॉक करताना उमेदवारांच्या पात्रतेनुसार त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांनी पूर्वीचे प्राधान्यक्रम डिलिट करून नव्याने जनरेट करून लॉक करायचे आहेत. (Shikshak Bharti 2024)

शिक्षक भरतीसंदर्भात उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यासाठी पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटीनद्वारे उत्तरे देण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्त कार्यालयात उमेदवारांनी गर्दी करू नये, वेळोवेळी वेबसाईटवरून माहिती घ्यावी, अशा सूचनाही मांढरे यांनी केल्या आहेत. (Shikshak Bharti 2024)

हेही वाचा : 

Back to top button