शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे; दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षक भरती नाहीच | पुढारी

शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे; दिलेल्या वेळापत्रकानुसार शिक्षक भरती नाहीच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणारी शिक्षक भरती 2018 साली सुरू करण्यात आली. परंतु, 2023 साल उजाडले तरी भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यासाठी दोनदा अभियोग्यता आणि बुध्दिमापन चाचणी घेण्यात आली. परंतु, गेल्या पाच वर्षांत शिक्षक भरतीचे घोंगडे भिजतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी इच्छुक पात्रताधारकांचा संताप अनावर झाला आहे. राज्यात शिक्षक भरती व्यवस्थित होत नसल्यामुळे काही याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या.
त्या वेळी सुनावणीदरम्यान राज्य शासनाला शिक्षक भरतीसंदर्भातील वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शिक्षक भरती प्रक्रिया होणे गरजेचे होते. परंतु राज्य शासनाने विविध कारणांमुळे केवळ वेळकाढूपणा केल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया अर्धवट राहिली आहे. दरम्यान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीसंदर्भात प्रश्न विचारणार्‍या मुलीला शिक्षक भरतीमध्ये अपात्र करण्याबाबत खडसावले. त्यामुळे राज्यातील पात्रताधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून भरती प्रक्रिया नेमकी कधी होणार असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

असा आहे घटनाक्रम

  • जुलै 2022 : औरंगाबाद खंडपीठाचे शासनाला भरतीसंदर्भातील वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश  द्वितीय सत्र सुरू होण्यापूर्वी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठीचा रोडमॅप कोर्टात सादर. तो पाळला नाही.
  • 2022 च्या हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्र्यांनी 65 हजार 111 शिक्षक पदे रिक्त असून तत्काळ पदे भरण्याबाबत स्पष्ट केले.
  • जानेवारी 2023 मध्ये नव्या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेद्वारे उपलब्ध करून देत असल्याचे शासनाने स्पष्ट केले.
  • शिक्षण विभागाकडून पुन्हा शिक्षक भरतीचा रोडमॅप सादर. 15 जून 2023 पूर्वी शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन.
  • या काळात आधार आधारित संच मान्यता आणि बिंदुनामावली याची कारणे देत वेळ मारून नेला.
  • शिक्षणमंत्री कार्यक्रम किंवा कामानिमित्त जिथे गेले तिथे 30 हजार शिक्षक भरती केली, प्रक्रिया सुरू आहे अशी अनेकवेळा बतावणी केली.
  • आश्वासनाला कंटाळून पात्रताधारकांनी जुलै 2023 मध्ये 40 दिवस आयुक्त कार्यालय, पुणे व आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले.
  • यानंतर शिक्षणमंत्र्यांनी माध्यमांसमोर येऊन पंधरा दिवसांत भरती पूर्ण करणार अशी घोषणा केली.
  • त्यानंतरही बिंदुनामावलीचे कारण देत भरती टाळली. आजअखेर 34 जिल्हा परिषदा आणि काही महानगरपालिका, नगरपालिकांची बिंदुनामावली पूर्ण आहे.
  • सप्टेंबर 2023 मध्ये एका अभियोग्यताधारकाने मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
  • शिक्षण विभागाने न्यायालयात दिलेल्या रोडमॅपनुसार जून 2023 मध्ये शिक्षकांना शाळेवर नियुक्ती देणे अपेक्षित होते.
  • नोव्हेंबर संपला तरी जाहिराती आल्या नाहीत आणि पुढील प्रक्रियादेखील सुरू झाली नाही.
  • पात्रताधारकांचे 22 नोव्हेंबरपासून पुन्हा पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
  • 25 नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्र्यांनी बीड येथील कार्यक्रमात विद्यार्थिनीला अपात्र करण्याची धमकी देत खडसावले.
  • संतोष लष्करे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण करतो आहे, त्याची तब्येत बिघडत आहे, पण कोणताही नेता अगर अधिकारी याची दखल घेत नाही.
  • सरकार, प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे येऊ घातलेल्या आचारसंहितेत शिक्षक भरती बळी पडेल.
  • मागील 12 ते 14 महिन्यांत भरतीबाबत संथगतीने चाललेली प्रक्रिया पाहता पुढच्या 2 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य.

हेही वाचा

Mardaani 3 : राणी मुखर्जीच्या मर्दानी-3 चे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार

सरकार पिक विमा कंपन्यांच्या दावणीला : जयंत पाटील

Chhagan Bhujbal : विरोध करुनही भुजबळ गेले, ताफा जाताच शिंपडलं गोमुत्र

Back to top button