राज्य सरकारच्या पगारवाढीच्या तोडग्यावर एसटी कर्मचारी काय भूमिका घेणार ? | पुढारी

राज्य सरकारच्या पगारवाढीच्या तोडग्यावर एसटी कर्मचारी काय भूमिका घेणार ?

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राज्य सरकारकडून वेतनवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन उद्यापासून कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून भूमिका जाहीर करू अशी माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी दिली.

त्यांनी आझाद मैदानात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आजच निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले. विलीनीकरणाबाबत नेमण्यात आलेल्या समितीच्या अंतिम निर्णयानंतर विचार केला जाईल, अशी भूमिका सरकारची असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे एसटी कामगारांनी दोन्ही नेत्यांनाच आंदोलालतून बाजुला सारत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संप कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तसेच विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कामगार संघटनांना बगल देत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कामगारांनी आमदार खोत आणि पडळकर यांचे नेतृत्त्व मान्य केले होते. मात्र पगारवाढीवरच तडजोड करायची होती, तर तुम्हाला आंदोलनात यायची गरज नव्हती, अशा प्रतिक्रिया कामगारांमधून उमटू लागल्या आहेत.

सरकारला पगारवाढ देताना पुन्हा कामगार संघटनेसोबत करार करावा लागणार आहे. अर्थात भविष्यात पुन्हा पगारवाढीसाठी कामगारांना संघर्ष करावा लागेल, असे कामगारांचे म्हणणे आहे. परिणामी, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन नको, तर शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, या मागणीवर कामगार अडून बसले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button