parambir singh : फरार घोषित झालेले परमबीर सिंग म्हणतात, मी 'या' ठिकाणी आहे ! | पुढारी

parambir singh : फरार घोषित झालेले परमबीर सिंग म्हणतात, मी 'या' ठिकाणी आहे !

मुंबई; पुढारी ऑनलाईन

१०० कोटी वसूली आरोप करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणणारे मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांनी चंदीगडमध्ये असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना चंदीगडमध्ये असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास चौकशीसाठी हजर राहू असेही त्यांनी म्हटले आहे.

परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले आहे.

परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

भ्रष्टाचारांचे आरोप असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. याप्रकरणी ६ डिसेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येईल. सुनावणी दरम्यान परमबीर सिंह हे भारतातच आहेत अशी माहिती त्यांचे वकिल पुनीत बाली यांनी न्यायमूर्ती एसके कौल यांच्या खंडपीठाला दिली. तपास सीबीआयकडे सोपवल्यास ४८ तासांमध्ये सिंह हे सीबीआय समक्ष हजर होतील, अशी माहिती देखील बाली यांच्याकडून खंडपीठाला देण्यात आली.

महाराष्ट्र पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने सिंह समोर येत नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलाकडून करण्यात आला. सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्यांच्यावर कारवाई केली होती असे बुकी, खंडणीखोर तसेच इतर लोकांकडून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे, असा दावा बाली यांच्याकडून करण्यात आला. परमबीर सिंह यांना धमक्या देण्यात आल्या. गृहमंत्र्यांविरोधात पाठवण्यात आलेले पत्र मागे घेण्यासाठी दबाब टाकण्यात आला शिवाय गृहमंत्र्यांच्या बाबतीत शांत राहाण्यास सांगण्यात आल्याचा दावा देखील सिंह यांचे वकिल बाली यांच्याकडून करण्यात आला.

सिंह यांच्या वकिलांनी डीजीपी संजय पांडे तसेच परमबीर सिंह यांच्यात झालेल्या संवादाचे ट्रान्सक्रिप्ट खंडपीठासमक्ष वाचले. पांडे यांनी २० मार्चला सिंह यांच्याकडून पाठवण्यात आलेले पत्र मागे घेण्यास सांगितले. असे केले नाही, तर मिळालेल्या निर्देशांनूसार अनेक गुन्हे दाखल करण्यात येतील. गृहमंत्र्यांबद्दल शांती राखायची आहे.पंरतु, हे सर्व सीबीआयला पाठवल्यानंतर सीबीआयने देशमुख विरोधात गुन्हा दाखल केला, असे बाली यांच्या मार्फत सिंह यांनी खंडपीठाला सांगितले. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पमबीर सिंह यांना अटक न करण्याचे निर्देश देत त्यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button