

सेनगाव (जि. हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकर्यांनी कुटुंबासह नक्षलवादी (Naxalites) होण्याची परवानगी देण्याची मागणी तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे केली आहे. बुधवारी या संदर्भातील निवेदन तहसील कार्यालयाकडे सादर केले आहे.
सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे यावर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या सर्व आशा रब्बी हंगामावर टिकून आहेत. मात्र विज कंपनीने थकीत विज देयकापोटी कृषीपंपाचा विज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे पाणी असूनही विज पुरवठ्या अभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नाहीत. त्यातून रब्बीच्या पिकांचेही नुकसान होणार आहे.
विज कंपनीकडून प्रती शेतकरी 7500 रुपये भरणा करण्याचा तगादा लावला जात आहे. तर शेतकरी 3 ते 4 हजार रुपयांमध्ये तडजोड करण्यास तयार आहेत. मात्र विज कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही. रब्बीचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकर्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना कुटुंबासह नक्षलवादी (Naxalites) होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. या संदर्भात नामदेव पतंगे, गणेश सावके, संतोष सावके, राहूल कव्हर, शिवाजी सावके, गोपाल सावके, वैभव सावके, मनोहर सावके यांच्यासह शेतकर्यांनी सेनगावच्या तहसील कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. या अजब मागणीमुळे आता तहसील प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे.
शेतकर्यांना नक्षलवादी (Naxalites) होण्याची परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन तहसील मार्फत शासनाकडे सादर केले आहे. या शिवाय ग्रामपंचायत कार्यालयाजवळ फलकही लावला आहे. यामध्ये विज देयक माफी सोबतच इतर मागण्या मांडण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी गुरुवारी कनेरगावनाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नामदेव पतंगे यांनी दिला आहे.