एसटी कर्मचार्‍यांचा संप चर्चेतूनच सुटू शकतो : शरद पवार | पुढारी

एसटी कर्मचार्‍यांचा संप चर्चेतूनच सुटू शकतो : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

एसटी महामंडळाची आर्थिक स्‍थिती वाईट आहे. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्‍याची गरज आहे, असे स्‍पष्‍ट करत एसटीचा संप चर्चेतूनच सुटू शकतो, असा विश्‍वास राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी आज महाबळेश्‍वर येथे व्‍यक्‍त केला.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मेळाव्‍यानिमित्त शरद पवार महाबळेश्‍वर येथे आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्‍हणाले, यावर्षी राज्‍य सरकारला एसटीची पगार द्‍यावा लागला. एसटी महामंडळाला राज्‍य सरकारने आर्थिक मदत करावी, अशी स्‍थिती यापूर्वी कधीच नव्‍हती. एसटीचे अर्थकारण कसे सुधारावे, यावर विचार करण्‍याची गरज आहे. विलिनीकरणाचा मुदा हा उच्‍च न्‍यायालयात प्रलंबित आहे. त्‍यामुळें यावर भाष्‍य करता येणार नाही, असेही ते म्‍हणाले.

अन्‍य राज्‍यांतील एसटी कर्मचार्‍यांच्‍या वेतनाचा अभ्‍यास करावा

एसटी कर्मचार्‍यांच्‍याबाबत सहानभुतीने विचार व्‍हावा हे योग्‍यच आहे. मात्र या प्रश्‍नातील आर्थिक बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. एखादा निर्णय घेतल्‍यानंतर त्‍याचे परिणाम काय होतील, याचाही सरकारला विचार करावा लागतो. महाराष्‍ट्र सरकारने अन्‍य राज्‍यांतील एसटी कर्मचार्‍यांच्‍या वेतनाचा अभ्‍यास करावा, असे आवाहनही त्‍यांनी केली.

शशिकांत शिंदे यांनी जिल्‍हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे होते

जिल्‍हा बँकेची निवडणूक आम्‍ही पक्ष म्‍हणून निवडली होती. या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. शशिकांत शिंदे यांनी जिल्‍हा बँकेची निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे होते, असेही शरद पवार यांनी स्‍पष्‍ट केले.

पुढील तीन ते चार महिन्‍यात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका होवू शकतात, असे संकेतही त्‍यांनी यावेळी दिले. निवडणुकांच्‍या तयारीसाठी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या मेळाव्‍याचे आयोजन केले होते. आगामी निवडणुकांच्‍या तयारीसाठी हा मेळावा होता, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार स्‍थापन झाल्‍यानंतर हे सरकार १५ दिवसांत पडेल, असे भाकीत विरोधक वर्तवत होते. एक वर्ष झाले, दोन वर्ष झाले तरी हे सरकार कायम आहे. भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांना आता खूपच वेळ आहे. आता पुढील तीन वर्ष तरी ते महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे सागंत राहतील, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

हेही वाचलं का?

 

Back to top button