पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. यानुसार, काल रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहिले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित होते. त्यानंतर ईडीच्या कारवाईला विरोध म्हणून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावरून 'काळजीवाहू ताई 'तेव्हा' रस्त्यावर का उतरल्या नाही?' असा सवाल अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. (Rupali Chakankar On Supriya Sule)
चाकणकर म्हणाल्या, आज रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधात काळजीवाहू ताई रस्त्यावर उतरलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मला हा प्रश्न पडतो की, जेव्हा आदरणीय अजितदादांवर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई आणि चौकश्या सुरू होत्या, त्यावेळेस अशा प्रकारचे मोर्चे का नाही काढले..?? किंवा अशा प्रकारे काळजीवाहू ताई रस्त्यावर का उतरल्या नाही..?, तुम्हाला दादांच्या पाठीशी उभे राहणं गरजेचे वाटले नाही का..?
केवळ आदरणीय अजितदादाच नाहीत तर जयंत पाटील साहेब, अनिल देशमुख साहेब, छगन भुजबळ साहेब ,नवाबभाई मलिक, प्राजक्त तनपुरे यांच्या वेळेस देखील कधीही मोर्चे काढले नाहीत. पक्षासाठी नेहमी झटणाऱ्या या नेत्यांना अडचणीच्या काळात आधार द्यावा, असे तुम्हाला वाटले नाही का…? असा सवाल देखील रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गट आणि व्यक्तिगत खासदार सुप्रिया सुळे यांना केला आहे.
अजितदादांनी वेगळा निर्णय घेतल्याची १०० खोटी कारणे तुम्ही देत असाल, परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थापलीकडे पक्षातील कुणालाही कुटुंब म्हणून मानत नाही हेदेखील तितकेच विदारक सत्य आहे, असा आरोप देखील अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटावर केला आहे.
हेही वाचा: