Davos 2024: एमएमआरडीए – फिनलँड येथील रिव्हर रिसायकल ओवाय यांच्यात सामंजस्य करार | पुढारी

Davos 2024: एमएमआरडीए - फिनलँड येथील रिव्हर रिसायकल ओवाय यांच्यात सामंजस्य करार

दावोस, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगर क्षेत्रात प्रदेशातील पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एमएमआरडीएला आता हेलसिंकी, फिनलंड येथील रिव्हर रिसायकल ओवाय (RR) चे सहकार्य लाभणार आहे. नद्यांचे संरक्षण, पूर प्रतिबंध, पर्यावरण सुधारणा आणि हवामान बदल यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. दावोसमधील 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये या करारावर सह्या करण्यात आल्या. Davos 2024

हा सामंजस्य करार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात तर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, संजय मुखर्जी यांच्या देखरेखीखाली झाला आहे. समुद्रात टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टीकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी रिव्हर रिसायकल ओवाय ही संस्था अत्यंत प्रभावी काम करते. या सामंजस्य करारामुळे या संस्थेच्या मार्गदर्शनाचा एमएमआरडी क्षेत्रामध्ये जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी फायदा होणार आहे. Davos 2024

या सामंजस्य करारामुळे उभय पक्षांना फायदा होणार आहे. या सामंजस्य करारामुळे एमएमआर क्षेत्रात नद्यांचे संरक्षण, पूर प्रतिबंध, पावसाचे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे यासह हवामानाशी निगडीत आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्ग शोधण्यासाठी माहिती आणि ज्ञानाची देवाण घेवाण शक्य होणार आहे. हवेची गुणवत्ता सुधारणे आणि एमएमआर क्षेत्र आणि आसपासच्या परिसरात ‘सिटी स्पंज’ (पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची प्रक्रिया) तयार करणे यासाठी एमएमआरडीएला मार्गदर्शन मिळणे या सामंजस्य करारामुळे सुलभ होणार आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, फिनलंडमधील रिव्हर रीसायकल ओयसोबत केलेला सामंजस्य करार शाश्वत विकासासाठीच्या संतुलित दृष्टीकोनाला पूरक असा आहे. या करारामुळे नदी स्वच्छतेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना अधिक गती मिळेल आणि कामाचा दर्जा सुधारण्यासही मदत होईल.

फिनलंडमधील हेलसिंकी येथील रिव्हर रीसायकल ओवायच्या मुख्य वित्तीय अधिकारी टीना नायफोर्स यांनी म्हणाल्या की, महासागरांमधील प्रदूषण थांबवण्यासाठी जगभरातील नद्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एमएमआरडीएसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार हा आमचे जागतिक ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

हेही वाचा 

Back to top button