दावोसच्या आर्थिक परिषदेत होणार तीन लाख दहा हजार कोटींचे करार | पुढारी

दावोसच्या आर्थिक परिषदेत होणार तीन लाख दहा हजार कोटींचे करार

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणार्‍या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी, 16 तारखेला दहाजणांच्या शिष्टमंडळासमवेत दावोसला पोहोचत आहेत. या परिषदेत प्रथमच विक्रमी असे 3 लाख दहा हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.

दावोस येथे 15 ते 19 जानेवारी या कालावधीत ही जागतिक आर्थिक परिषद होणार आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत तसेच उद्योग विभाग, एमआयडीसी, मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी, असे दहाजणांचे शिष्टमंडळ जात आहे. एमएमआरडीए व महाप्रीत येथील 8 अधिकारी स्वतंत्ररीत्या सहभागी होत असून, या सर्वांना केंद्र शासनाची मान्यता मिळाली आहे. या दौर्‍यात खासगी विमानाचा वापर होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असून, गेल्यावर्षी या परिषदेत 1 लाख 37 हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी 76 टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. या परिषदेसाठी यंदाही भारताच्या दालनाच्या जवळ महाराष्ट्राचे अद्ययावत असे दालन उभारण्यात आले असून, या ठिकाणी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या करण्यात येतील. तसेच मुख्यमंत्री तेथे नामवंत विदेशी उद्योगांच्या प्रमुखांशी चर्चा करतील. यासाठी या दालनात बैठक कक्ष बनविण्यात आले आहेत, तसेच महाराष्ट्राच्या घोडदौडीविषयी माहिती देणारे द़ृकश्राव्य प्रदर्शनही तेथे असेल.

महाराष्ट्राचे प्रभावी ब्रँडिंग करणार

16 तारखेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात येईल. ओमानचे उद्योगमंत्री, सौदी अरेबियाचे वित्तमंत्री, दक्षिण आफ्रिकेचे ऊर्जामंत्री, दक्षिण कोरियाच्या ग्योगी प्रांताचे गव्हर्नर तसेच डीपी वर्ल्ड, लुईस ड्रेफस, वित्कोविझ एटोमिका या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल. जागतिक आर्थिक परिषदेचे कृषी आणि अन्न प्रक्रिया गटाचे सदस्यही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्या दिवशी संध्याकाळी प्रमुख प्रतिनिधी व मान्यवरांना महाराष्ट्रातर्फे स्नेहभोजन आयोजित केले आहे.

दावोस दौर्‍याचा हिशेब जनतेला देणार ः मंत्री सामंत

महाराष्ट्राचे नाव मोठे करण्यासाठी काही जण स्वत:च्या खिशातून दावोस दौर्‍यासाठी पैसे खर्च करत असतील, तर त्यात काहीही गैर नाही. ज्यांनी कधीच स्वत:च्या खिशातून पैसे काढले नाहीत, त्यांना याचे अप्रूप असू शकते, असे सणसणीत प्रत्युत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांना दिले. दावोस दौर्‍यावरून परतल्यानंतर खर्चाच्या एक-एक पैशाचा हिशेब आम्ही जनतेला देऊ. मुख्यमंत्र्यांचा हा दावोस दौरा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरेल. कारण, या दौर्‍यात अनेक महत्त्वाचे करार केले जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वर्‍हाड निघालेय दावोसला; आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौर्‍यासाठी केवळ दहाजणांकरिता मंजुरी असताना सत्तरजणांचा लवाजमा कशाला, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. वर्‍हाड निघालेय लंडनला, तसे हे वर्‍हाड निघालेय दावोसला, असा प्रकार असल्याची टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून, हा दौरा आहे की सहल? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही दावोस दौरा म्हणजे जनतेच्या पैशांचा चुराडा असल्याचा आरोप केला आहे.

Back to top button