दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

दावोसमध्ये ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने 3 लाख 10 हजार 850 कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्या 42 हजार 825 कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने 3 लाख 53 हजार 675 लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांतून राज्यातील जनतेला दिली.

याव्यतिरिक्त उद्योगांनी 1 लाख कोटींच्या गुंतवणुकीत स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. या करारांमुळे राज्यात 2 लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक सामंजस्य करार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या करारांवेळी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते.

परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 16 तारखेस 6 उद्योगांसमवेत 1 लाख 2 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून 26 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. 17 जानेवारीस 8 उद्योगांशी 2 लाख 8 हजार 850 कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून 1 लाख 51 हजार 900 रोजगार निर्मिती होईल. उद्या 6 उद्योगांशी 42 हजार 825 कोटींचे करार होत आहेत.

गुंतवणूक करार झालेले उद्योग व रोजगार

16 जानेवारी : आयनॉक्स एअर प्रोडक्ट 25 हजार कोटी (5 हजार रोजगार), बी.सी. जिंदाल 41 हजार कोटी (5 हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील 25 हजार कोटी (15 हजार रोजगार), एबी इन बेव्ह 600 कोटी (150 रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट 1000 कोटी (650 रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी 10 हजार कोटी (200 रोजगार)
17 जानेवारी : अदानी ग्रुप 50 हजार कोटी (500 रोजगार), स्वीस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स 1158 कोटी (500 रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क 50 हजार कोटी (1 लाख रोजगार), वेब वर्क्स 5ह्जार कोटी (100 रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस, इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून 3500 कोटी ( 15 हजार रोजगार), नैसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी 20 हजार कोटी ( 4 हजार रोजगार)

महाप्रीतचे हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी 56 हजार कोटींचे करार

अमेरिकास्थित प्रेडिक्शन्स समवेत 4 हजार कोटी, युरोपमधील हीरो फ्यूचर एनर्जीमध्ये 8 हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जीमध्ये 40 हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत 4 हजार कोटींचे करार.

आज होणारे सामंजस्य करार आणि कंसात रोजगारनिर्मिती

सुरजागड इस्पात 10 हजार कोटी (5 हजार रोजगार), कालिका स्टील 900 कोटी (800), मिलियन स्टील 250 कोटी (300), ह्युंदाई मोटर्स 7 हजार कोटी (4 हजार), कतारची एएलयू टेकसमवेत 2075 कोटी (400), सीटीआरएलएस 8600 कोटी (2500)

1 लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य

याशिवाय विविध उद्योगांनी 1 लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले आहे. यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

भारताच्या यशोगाथेचा बोलबाला

दावोस; पीटीआय : भारत सरकारने केलेल्या ठोस आर्थिक उपाययोजनांमुळे देशाने आर्थिक स्तरावर यशोगाथा प्रस्थापित केली आहे, असे गौरवोद्गार अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी काढले. दावोस येथील 53 व्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी ब्लिंकन दावोसमध्ये आले आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतात उत्तम प्रकारे आर्थिक उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे भारताने आर्थिक आघाडीवर यशोगाथाच प्रस्थापित केली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेने देदीप्यमान कामगिरी केली आहे.

मोदी सरकारच्या धोरणांचा भारतीयांना लाभ होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. भारत-अमेरिकेतील संबंधांना चालना देण्यासाठी उभय नेत्यांमध्ये सातत्याने संवाद होतो. शाश्वत विकासासाठी अमेरिका भारताच्या खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. एकीकडे भारत आर्थिक पातळीवर प्रगती करीत असताना त्या देशात वाढत्या हिंदुत्ववादाबाबत चिंता वाटते का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर त्यांनी भारताचे कौतुक केले.

अयोध्येत गुंतवणूक करण्यास जगभरातील उद्योगपती इच्छुक

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता दावोस परिषदेमध्येही पाहावयास मिळाली. अयोध्येत गुंतवणूक करण्यास जगभरातील अनेक उद्योगपतींनी इच्छा व्यक्त केली. अयोध्या हे धार्मिक आणि पर्यटनस्थळ असल्याने अनेक गुंतवणूकदारांची नजर अयोध्येकडे लागून राहिली आहे. दरम्यान, दावोसमध्येही 22 जानेवारी रोजी दीपप्रज्वलन करण्यात येणार आहे. याशिवाय धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत.

Back to top button