Eknath Shinde : दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; औद्योगिक गुंतवणुकींबाबत चर्चा | पुढारी

Eknath Shinde : दावोस येथे विविध देशांच्या शिष्टमंडळांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; औद्योगिक गुंतवणुकींबाबत चर्चा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीच्या काही सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तर विविध देशांतील शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा केली. Eknath Shinde

परिषदेच्या आजच्या पहिल्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्यमंत्री अब्दुला बिन टौक आणि लुलू हायपर मार्केटचे कार्यकारी संचालक एम.ए. युसुफ अली यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या दोघांसमवेत झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात असलेली गुंतवणुकीची संधी आणि त्या क्षेत्रात दीर्घकालिन संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. Eknath Shinde

शिंडलर इलेक्ट्रिकचे आंतरराष्ट्रीय कार्यान्वयन कार्यकारी उपाध्यक्ष मनीष पंत यांच्याशी देखील चर्चा झाली. महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीच्या क्षेत्राबाबत संवाद साधतानाच औद्योगिक संबंध दृढ करण्याबाबत शिष्टमंडळासोबत चर्चा झाली.

बेल्जियम येथील एबीआयएन बेव्ह या बहुराष्ट्रीय पेय आणि मद्यनिर्मिती कंपनीसोबत महाराष्ट्रातील गुंतवणकीच्या ६०० कोटी रुपयांच्या ($ ७३ दशलक्ष) सामंजस्य करारावर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे राज्यात शेकडो रोजगार निर्माण होण्यास मदत होणार असून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

गुंतवणुकी संधींबद्दल ओमानचे उद्योग मंत्री एच.ई. कैर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी विविध विषयांवर संवाद साधतानाच ओमानच्या डिजिटल परिवर्तनाच्या व्हिजन २०४० साठी महाराष्ट्र कशाप्रकारे सहकार्य करू शकतो, यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.

आज मुख्यमंत्र्यांनी दावोस मधील सीआयआयच्या इंडिया बिझिनेस हबला भेट दिली. दावोस मधल्या जागतिक आर्थिक परिषदेत भारतीय तिरंगा डौलाने फडकत असून ते अभिमानस्पद असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button