कोपरखैरणे : पुढारी वार्ताहर : सायनमध्ये कॉलेजात शिकणाऱ्या कळंबोलीतील १९ वर्षीय तरूणीचा छडा लावण्यात नवी मुंबई पोलिसांना महिनाभरातनंतर अखेर यश आले. या युवतीची हत्या करून तिच्या प्रियकराने जीवन संपवल्याचे स्पष्ट झाले आहे. या युवतीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमे-याची मदत घेण्यात आली होती, हे विशेष.
गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी या प्रकरणाची बुधवारी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. कळंबोलीतील वैष्णवी बाबर ही १२ डिसेंबरला महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडल्यानंतर घरी परतलीच नव्हती, शोध घेताना मंगळवारी तिचा मृतदेह खारघरमध्ये निर्जनस्थळी सापडला होता.
वैष्णवी सायनच्या एसआयएस महाविद्यालयात शिकत होती. ती बेपत्ता झाली त्याच दिवशीपासून कळंबोलीतील वैभव बुरुंगल नावाचा तिचा प्रियकरही गायब असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. दरम्यानच्या काळात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांचे पथक वैष्णवीचा शोध घेत होते. खारघरच्या डोंगररांगांमध्ये वैष्णवीचा शोध पोलिसांसोबत लोणावळ्याची शिवदुर्ग रेस्क्यू टीम, सिडकोचे अग्निशमन दल, वन विभाग यांचे कर्मचाऱ्यांनी घेतल्यावर वैष्णवी मृतावस्थेत सापडली.
पोलिस तपासात वैभवनेही १२ डिसेंबरलाच जुईनगर येथे लोकल खाली उडी घेत जीवन संपवल्याचे समोर आले. त्यापूर्वी वैभवने मोबाईलमध्ये खून करून जीवन संपवणार असल्याचे सांकेतिक भाषेत लिहून ठेवले होते. पोलिसांच्या पथकाने या सांकेतिक शब्दाचा उलगडा केला. वैष्णवी व वैभवचे तीन ते चार वर्षांपासून प्रेम होते. वैष्णवीच्या घरातून लग्राला विरोध असल्याने वैष्णवीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता वैष्णवी आपल्याला भेटणार नसल्याचे समजताच वैभवने तिला अखेरच्या भेटीसाठी बोलावले. नंतर खारघर येथे नेऊन तिचा खून केला आणि त्यानंतर आपली जीवनयात्रा संपविल्याचे तपासात उघड झाल्याचे काळे यांनी सांगितले.
वैभव व वैष्णवी यांचे तीन चार वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र त्याच्या डोक्यात वैष्णवीबाबत संशयाचे भूत बसले. त्यातून वाद सुरू झाले. यातून वैष्णवी माझी नाही तर कुणाचीच नाही, या निर्णयाप्रत वैभव आला. त्याने वैष्णवीला संपवून स्वतः जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी एक महिन्यापूर्वीच त्याने योजना आखली. त्यानुसार त्याने १२ तारखेला वैष्णवीला शेवटचे भेटण्यासाठी घराबाहेर बोलावले. ती येताच दोघे पारसिक हिल परिसरात फिरले. नंतर खारघर हिल्स येथील जंगलातील ठरलेल्या LII ५०१ या झाडाजवळ गेले. तिथे त्याने दुकान किंवा विमानतळावर वस्तू बंदिस्त करण्यासाठी वापरतात तो टॅग गळ्याभोवती आवळून तिला ठार केले. विशेष म्हणजे हे सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड करीत त्यात त्याने तुझी हत्या करून मीही आत्महत्या करणार असल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे तर तशी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. प्रकरणाचा तपास करताना अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांनी शोधाशोध करीत LII ५०९ या कोडवर्डचा उलगडा केला. तेव्हा जंगलातील झाडांना असे नंबर दिले जातात हे समोर आले. खारघर हिल्स भागात या क्रमांकाचे झाड शोधल्यावर त्या झाडाखाली वैष्णवीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. घड्याळ व कपड्यावरून तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
हेही वाचा :