नंदुरबार – शहरातील भोणे फाटा परिसरात तात्पुरते तंबू टाकून रहिवास करणाऱ्या परप्रांतीयांच्या एका झोपडीत बुधवार रोजी रात्री झालेल्या स्फोटाने मोठी खळबळ उडाली. स्फोट इतका भीषण होता की, आजुबाजुच्या घराच्या भिंती थरथरल्याचे भोवतालच्या लोकांनी सांगितले. तथापि घटनास्थळी सिलेंडर कुकर अथवा तत्सम स्फोटजन्य वस्तूंचे अवशेष किंवा खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हे गौडबंगाल काय असावे याचा शोध पोलीस घेत आहेत. (Nandurbar Blast)
प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार परिसर हादरवून सोडणारा आवाज ऐकून नगरपालिका घरकुल इमारतीत राहणारे लोक आणि वडार वसाहत, गांधीनगर गोपाळ नगर, जयचंद नगर सर्व भागातून तिथे लोक धावून आले. या घटनेत कापडी तंबू सारखी उभारलेली ती झोपडी आणि त्यातील सामान उध्वस्त झालेले दिसले. या घटनेत दोन लहान मुली जायबंदी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. छोट्या बॉम्बस्फोटासारखा झालेला तो आवाज नेमका कसला होता? याचा उलगडा झालेला नाही. (Nandurbar Blast)
घटनास्थळी स्फोटाच्या कुठल्याही खुणा आढळून आलेल्या नाही असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पवार, सहायक निरीक्षक नंदा पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज गुरुवार (दि. 18) पहाटे पर्यंत तो परिसर तपासणे व पंचनामा करणे चालू होते. ज्यांच्या झोपडीत घटना घडली त्यातील रहिवासी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. हा परिवार परप्रांतीय असून कालच 17 जानेवारी 2024 रोजी दुपारी तिथे राहायला आला होता आणि आल्यापासून त्यांचे जोरदार भांडण आपसात चालू होते असे भोवतालच्या रहिवाशांनी सांगितले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम अद्याप चालू आहे.
हेही वाचा :