IAS अधिकारी अमन मित्तलसह भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल | पुढारी

IAS अधिकारी अमन मित्तलसह भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल

कोपरखैरणे; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबईत राहणारे आयएएस अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचा भाऊ देवेश मित्तल तसेच अन्य चार अनोळखी व्यक्ती विरोधात मारहाण केल्याचा रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी इंटरनेट सेवा देणाऱ्या दोन व्यक्तींना त्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर मित्तल यांनीही दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे या कलमान्वये इंटरनेट सेवा कर्मचारी सागर मांढरे याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

मित्तल हे घणसोली सेक्टर ६ येथे राहतात. काही दिवसापूर्वी त्यांच्याकडे इंटरनेट सेवेबाबत समस्या निर्माण झाल्याने त्यांनी तंत्रज्ञ सागर मांढरे यांना फोन करून बोलावून घेतले. सागर यांनी इंटरनेट सुरु केल्यावर ते व्यवस्थित चालू असल्याचे निदर्शनास आले. तसे त्यांनी इंटरनेट सेवा वापरूनही दाखवली. मात्र शयन कक्षात वायफाय सुविधा मिळत नसल्याची तक्रार मित्तल यांनी केली. त्याची तपासणी केली असता राउटर दरवाजाच्या मागे लावले असल्याने शयन कक्षापर्यंत रेंज जात नाही, असे मांढरे यांनी सांगितल्यावर मित्तल यांनी जोर जोरात बोलणे सुरु केले. मात्र आपण जोर जोरात बोलू नये म्हणून मांढरे यांनी सांगताच मित्तल भावांनी दरवाजा आतून बंद करून मांढरे यांना मारहाण सुरु केली. मारहाण करीत असतानाच मित्तल यांनी इंटरनेट कंपनीतील भूषण गुजर यांना फोन करून घरी येण्याचे सांगितले त्याचवेळी मित्तल यांच्या भावाने त्यांच्या फोनवरून फोन करत अन्य कोणाला तरी बोलावले. दरम्यान भूषण हे आले असता त्यांनाही मारहाण सुरु केली. ही घटना घडत असताना देवेश मित्तल यांनी बोलावलेले चार जण आले आणि त्यांनी पीयूसी पाईप आणि बांबूने दोघांनाही बेदम मारहाण केली. यावेळी दोघांनीही इंटरनेट बाबत काय समस्या आहे ती वरिष्ठांना बोलावून सोडवू, पण मारू नका, अशी विनंती केली. यावेळी अमन मित्तल यांनी पोलिसांना फोन केल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले व त्या ठिकाणी मांढरे व भूषण यांना उपचारासाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवले. वैद्यकीय अहवाल येताच रबाळे पोलिसांनी अमन मित्तल त्याचा भाऊ देवेश तसेच अन्य चार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

अमन  मित्तल यांनीही सागर मांढरे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. मांढरे याच्याही विरोधात शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सदर सदनिका त्यांचे भाऊ देवेश यांची असून नवीनच खरेदी केली आहे. त्याठिकाणी एअरटेलची इंटरनेट सेवा घेण्यात आली. मात्र ती काही वेळात बंद पडल्याने तंत्रज्ञ बोलावल्यावर मांढरे आले. त्यांना वायफाय सेवा सुरु करता आली नाही. यावरून वाद झाला यामध्ये मांढरे यांनी मित्तल यांना लाथ मारली व जवळील मशीन तोंडावर मारल्याने रक्त आले. त्यामुळे त्यांनी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांना बोलावले. असे मित्तल यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button