मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विदेशातून सोने आणि ड्रग्ज तस्करी करण्यासाठी तस्करांकडून नवनवीन शकला लढवल्या जात आहेत. यावेळी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबई विमानतळावर कारवाई करीत युगांडाच्या महिलेला ८.९ कोटी रुपये किंमतीच्या कोकेनसह अटक केली. या महिलेने हे ड्रग्ज केसांचा विग आणि अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. तस्करीसाठी कोकेन लपवून ठेवण्यासाठी तिने लढवलेली शक्कल पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. (Mumbai )
विदेशातून येणारी एक महिला मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती डीआरआयच्या मुंबई विभागाला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय पथकाने मंगळवारी सापळा रचून युगांडाहून आलेल्या महिला प्रवाशाला ताब्यात घेतले. ती एंटेबेहुन नैरोबीमार्गे मुंबईत आली होती. डीआरआय अधिकाऱ्यांना सुरुवातीला तिच्या सामानाच्या झडतीत काही सापडले नाही. याच दरम्यान अधिकाऱ्यांना तिच्या केसांवरील विगचा संशय आला.अधिकाऱ्यांनी तातडीने हा विग तपासल्यावर त्यात कोकेन सापडले. त्यानंतर तिची अंतर्वस्त्रे तपासल्यावर त्यातही कोकेन आढळले. अशाप्रकारे तिच्याकडून ८.९ कोटी रुपये किमतीचे ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.
विदेशातून सोने, हिरे, ड्रग्ज तस्करीसाठी बॅग, बुट, कपड्यांमधील चोर कप्प्यांपासून विविध वस्तूंच्या आत भरुन किंवा आवरणात सील करुन, अंतरवस्त्रात लपवून, कॅप्सूल आणि अन्य पद्धतीने सेवन करुन पावडर, द्रव, धातू स्वरुपात वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जात आहे.
हेही वाचा