भुजबळांनी ईडी चौकशी बंद होण्यासाठी कोणता चमत्कार केला? उद्धव ठाकरेंची टीका | पुढारी

भुजबळांनी ईडी चौकशी बंद होण्यासाठी कोणता चमत्कार केला? उद्धव ठाकरेंची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : छगन भुजबळांनी असा कोणता चमत्कार केला की त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या. त्यांची चौकशी अचानक बंद कशी झाली. भूजबळ आणि पटेल यांना आता राजमान्यता मिळाली आहे. त्यामुळे भुजबळांकडे पेढा खायला आणि पटेलांकडे कमी तिखट खायला जाणार आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. आज (दि.१२) नागपूर येथे विधीमंडळ सभागृह परिसरात माध्यमांशी ते बोलत होते. (Maharashtra Assembly Winter Session 2023)

राष्ट्रवादीचे नेते व कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका सक्तवसुली संचालनालयाने (ED) मागे घेत असल्याचे उच्च न्यायालयात सांगितले होते. यावरून उद्धव ठाकरे यांनी भुजबळांवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, काही वर्ष तरूंगात ठेवल्यानंतर भुजबळांनी असा कोणता चमत्कार केला की, अचानक चौकशी बंद झाली. हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेणार आहे. तसेच संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पटेल यांच्याकडेही कमी तिखट खायला जाणार आहे, असा टोला त्यांनी लगावला.

आनंद निरगुडेंवर दबाव आणणाऱ्या मंत्र्यांची नावे जाहीर करा

आनंद निरगुडे यांना राजीनामा द्यायला कोणी भाग पाडलं? त्यांच्यावर दबाव आणलेले मंत्री कोण आहेत? यामागे नेमकं काय दडलंय? त्याची माहिती सरकारने द्यावी. हा राजीनामा याआधी दिला असल्याचे समजतं. सभागृहासून ही माहिती का लपवली आणि निरगुडे यांना राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेची असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईची चौकशी जरूर करा, असे आवाहन जाहीर सभेत केलं आहे. मात्र नागपूर पाण्यात बुडवणाऱ्या विकास पुरूषांचीही चौकशी करा. नागपूर बूडत असताना स्वत: मात्र घरामध्ये बॉलिवूड तारकांसोबत फोटो काढत होते, अशी टीका ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

केसरकरांचे बाळासाहेबांबद्दलचे उद्गार संतापजनक : अनिल परब

शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबबद्दल काढलेले उद्गार संतापजनक आहेत. बाळसाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहे, असे सांगत त्यांनी गद्दारी केली आहे. ज्यांचा बाळासाहेबांशी कधीही संबंध आला नाही, त्याच खर स्वरूप आज साक्षीपुराव्याच्या माध्यमातून समोर आले आहे. अशा लोकांचे बाळासाहेबांबद्दल प्रेम बनावट आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी ते गेले होते हे अप्रत्यक्ष स्पष्ट झाले आहे, असे परब म्हणाले. दरम्यान याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या याचा रेकॉर्ड आमच्याकडे असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button