भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार; अनुराग ठाकूर म्हणाले…. | पुढारी

भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार; अनुराग ठाकूर म्हणाले....

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयसीसीने नुकतीच आपल्या पुढच्या १० वर्षाच्या क्रिकेट कार्यक्रमाची घोषणा केली. या घोषणेत कोणत्या देशात किती स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत याची माहितीही देण्यात आली. मात्र या सर्वांमध्ये लक्षवेधी ठरलेली बातमी म्हणजे २०२५ मध्ये पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीची कोणतीही स्पर्धा झाली नव्हती. याचबरोबर अनेक देशांच्या संघांनी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता.

भारताने तर पाकिस्तान दौरा करणे बंदच केले आहे. मात्र आता २०२५ ला चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानात होत आहे. त्यामुळे या घोषणेनंतर भारतीय संघ २००७ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपले मत व्यक्त केले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दहशतवादावरून ताणाव निर्माण झाल्यानंतर या दोन्ही देशांमधील क्रीडा संबंध संपुष्टात आले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका, तसेच एकमेकांचे दौरे देखील बंद आहे. मात्र आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने भारताला पाकिस्तानचा दौरा करावाच लागणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय हा बीसीसीआय आणि भारत सरकार यांच्या विचार विनिमयानेच होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना माध्यम प्रतिनिधिंनी भारत चॅम्पियन्स ट्रॉफी निमित्त पाकिस्तान दौरा करणार का असे विचारले. त्यावेळी त्यांनी ‘वेळ आल्यानंतर काय करायचे ते ठरवू. या निर्णयात गृह मंत्रालय देखील सहभागी होईल. अनेक देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला आहे. वेळ येईल त्यावेळी सुरक्षेता पुन्हा एकदा आढावा घेतला जाईल आणि निर्णय घेतला जाईल.’ गेल्या १४ वर्षापासून भारताने पाकिस्तान दौरा केलेला नाही. तर २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाकिस्तानात जवळपास दोन दशकानंतर आयसीसीची मोठी स्पर्धा होणार आहे.

भारताला तीन आयसीसी स्पर्धांचे आयोजक पद (पाकिस्तान दौरा )

आयसीसीने २०२५ मध्ये पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करणार आहे. तर २०२४ चा टी २० वर्ल्डकप हा वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत खेळवला जाणार आहे. अमेरिकेत पहिल्यांदाच क्रिकेटची जागतिक स्पर्धा होईल. तर भारताला तीन आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळणार आहे. यात २०२६ चा टी २० वर्ल्डकप, २०३१ चा एकदिवसीय वर्ल्डकपचा देखील समावेश आहे. भारत हा एकदिवसीय वर्ल्डकप श्रीलंका आणि बांगला देश यांच्या सोबत आयोजित करणार आहे. याचबरोबर २०२९ ची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील भारतात होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button