Amol Kolhe: महापालिका शहर विकासासाठी की, पक्षाच्या प्रचारासाठी?- खासदार कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल | पुढारी

Amol Kolhe: महापालिका शहर विकासासाठी की, पक्षाच्या प्रचारासाठी?- खासदार कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील जवळपास सर्वच स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. दरम्यान शासन महापालिकांसोबत ‘बिग बॉस’चा (भाजप) खेळ खेळत आहे. दरम्यान या बिग बॉसने मनपांना नवा टास्क दिला आहे. ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ नावाचा उपक्रम हाती घेऊन तो महापालिकांना राबविण्यासाठी सांगण्यात आले आहे. या माध्यामातून केंद्र सरकार भाजपचा प्रचार करण्यासाठी राज्यातील मनपाला हाताशी धरत आहे. यावरून महापालिका शहर विकासासाठी की, पक्षाच्या प्रचारासाठी? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. (Amol Kolhe)

Amol Kolhe: शासन ‘बिग बॉस’चा खेळतय- खा.कोल्हेंचा आरोप

खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यातील एकूण २७ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात प्रशासन कारभार पाहत आहेत. ना नगरसेवक, ना महापौर ना कोणत्या समित्या… ना सभागृहात शहराच्या विकासाबाबत चर्चा होते, ना लोकप्रतिनिधींना जनतेचा आवाज मांडता येतो. सर्व कारभार प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. शहरे बकाल होत असताना दुसरीकडे शासन मात्र महापालिकांसोबत ‘बिग बॉस’चा खेळ खेळत आहे. आता ‘बिग बॉस’ म्हणजे सत्ताधारी भाजप. या बिग बॉसने महापालिकांना नवा ‘टास्क’ दिल्याचा आरोप देखील अमोल कोल्हे यांनी केला आहे.

ताकाला जाऊन भांडे लपविण्यापेक्षा भाजपाने…

‘बिग बॉस’ने प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण महापालिका हायजॅक केली आहे. त्यानंतर आता ही मनपा कार्यालये भाजपाची अधिकृत प्रचारकार्यालये केली जात आहेत. ताकाला जाऊन भांडे लपविण्यापेक्षा भाजपाने सरळ सरळ महापालिकांच्या इमारतीवर आपले चिन्हं लावून प्रचार करावा. तुमचं काय करायचं ते जनता बघून घेईल कारण लक्षात ठेवा, जनता जरी या सगळ्यांचा एकदाच हिशेब करीत असली तरी तिच्या नोंदवहीत प्रत्येकाची नोंद असते. अशी राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी सरकारची खासदार कोल्हे यांनी कानउघडणी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button